घरफोडी, गाड्यांची बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:46+5:302021-03-30T04:16:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरात घरफोडीसह वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला ...

घरफोडी, गाड्यांची बॅटरी चोरणाऱ्या टोळीला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात घरफोडीसह वाहनाच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला या गुन्ह्यातील टोळीला अटक करण्यात यश आले. या टोळीकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.
घरफोडी करून मोबाइल चोरल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह अमीन मीरासाहेब मुल्ला (वय २२, रा. श्यामरावनगर) याला अटक केली तर वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी इरफान महमंद जित्तीकर (२७, रा. जहीर मोहल्ला, श्यामरावनगर) व फिरोज शफीक हवालदार (२०, रा. कोल्हापूर रोड, रामनगर) या दोघांना अटक केली.
श्यामरावनगर परिसरातील घर फोडून अमीन मुल्ला हा चोरीचा माल विकण्यासाठी अंकली येथे थांबला असल्याची माहिती एलसीबीचे संतोष गळवे व संदीप पाटील या कर्मचाऱ्यांना मिळाली. अंकली येथील जैन वडासमोर पथकाने अमीन मुल्ला व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता ८ मोबाइल मिळून आले. मोबाइलबाबत विचारपूस करता अमीन याने उडवाउडवीची उत्तरे दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कसून चौकशी केल्यानंतर अमीन याने सांगली शहर, सांगली ग्रामीण, महात्मा गांधी चौकी, संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घर फोडून मोबाइल चोरल्याची कबुली दिली.
तसेच पथकाला श्यामरावनगरमधील इरफान जित्तीकर व साथीदार फिरोज हे वाहनांची बॅटरी चोरी करीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता माॅडर्न गल्ली येथील रिक्षामधून बॅटरी चोरल्याची कबुली दिली. या दोघांना शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई निरीक्षक सर्जेराव कायगवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक रविराज फडणीस, संदीप पाटील, संतोष गळवे, संदीप गुरव, महादेव धुमाळ, संदीप नलावडे, किशोर कदम, राहुल जाधव, अनिल कोळेकर यांच्या पथकाने केली.