छुप्या गुटखा विक्रीला पान असोसिएशनचा प्रतिबंध

By Admin | Updated: October 1, 2015 00:41 IST2015-09-30T23:47:00+5:302015-10-01T00:41:26+5:30

मेळाव्यात निर्धार : गांधी जयंतीपासून जिल्हाभर मोहीम

Home association ban for sale of hidden gutkha | छुप्या गुटखा विक्रीला पान असोसिएशनचा प्रतिबंध

छुप्या गुटखा विक्रीला पान असोसिएशनचा प्रतिबंध

सांगली : गुटखा बंदीचा शासनआदेश असतानाही सुरू असलेली छुपी गुटखा विक्रीही आता जिल्ह्यात बंद होणार आहे. पान असोसिएशनच्या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्वच विक्रेत्यांनी याबाबतची शपथ बुधवारी घेतली. यापुढे पानपट्टीतून किंवा कोणत्याही व्यावसायिकाकडून गुटखा विक्री झाली, तर त्याच्यावर पान असोसिएशनच कारवाई करेल, असा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात पानपट्टी असोसिएशनच्यावतीने मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्यात पूर्ण गुटखा बंदीचा निर्धार करण्यात आला. यावेळी मुंबई विडी-तंबाखू व्यापारी संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार हेगिस्टे म्हणाले की, शासनाने गुटखा बंदीनंतर आता सुगंधी तंबाखूवर बंदी आणली आहे. त्यावर लावलेले ३२८ कलम रद्द करण्यासाठी सध्या लढा सुरू करण्यात आला आहे. मुंबईपासून दिल्लीपर्यंत सातत्याने या प्रश्नावर पाठपुरावा सुरू आहे. राजकीय पाठबळ नसल्याने आता पान व्यावसायिकांना स्वबळावरच हा लढा लढावा लागेल. प्रत्येकाच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याने रस्त्यावर उतरावे लागेल.
महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजित सूर्यवंशी म्हणाले की, चांगला, आदर्श पायंडा आपण गुटखा बंदीच्या मोहिमेतून राबविणार आहोत. त्यासाठी सर्वांनीच या मोहिमेत सहभागी व्हावे. छुप्या पद्धतीने कोणी अन्य व्यावसायिक त्याची विक्री करीत असेल, तर तीसुद्धा रोखली पाहिजे. प्रतिज्ञा करूनही जे गुटखा विक्री करताना आढळतील, अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. यावेळी जिल्हा पानपट्टी असोसिएशनचे अध्यक्ष रत्नाकर नांगरे, मुंबई विडी-तंबाखू संघाचे सरचिटणीस प्रकाश साडविलकर, युसूफ जामदार, विष्णू सूर्यवंशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पानाच्या टपरीत मटका
अजित सूर्यवंशी म्हणाले की, संजयनगरमध्ये मेळाव्याच्या तयारीसाठी गेलेल्या काही पदाधिकाऱ्यांना पानाच्या टपरीत मटका व्यवसाय सुरू असल्याचे दिसले. ही गोष्ट लाजिरवाणी असून संबंधित दुकानावर कारवाई करू.

आर्थिक पाठबळाची गरज
सूर्यवंशी म्हणाले की, पानपट्टीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी न्यायालयीन लढ्याचीही गरज आहे. प्रत्येक पातळीवर लढा देताना संघटना म्हणून आर्थिक कसरत होत असते. त्यामुळे सर्वच पानपट्टीधारकांनी संघटनेला आर्थिक पाठबळही दिले पाहिजे. प्रत्येक पैशाचा हिशेबही त्यांना दिला जाईल.

Web Title: Home association ban for sale of hidden gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.