ताण कमी करण्यासाठी खाकी वर्दीतही जोपासला जातोय छंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:39+5:302021-05-10T04:25:39+5:30

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलावरील ताणही वाढत चालला आहे. रस्त्यावरील गर्दी कमी ...

Hobby is also practiced in khaki uniform to reduce stress! | ताण कमी करण्यासाठी खाकी वर्दीतही जोपासला जातोय छंद!

ताण कमी करण्यासाठी खाकी वर्दीतही जोपासला जातोय छंद!

सांगली : कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलीस दलावरील ताणही वाढत चालला आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठीच्या नियोजनासह कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी, होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नजर यामुळे पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे. अशा परिस्थितीतही ताणतणाव हलका करण्यासाठी पाेलीस दलातील कर्मचारी आपला छंद वेळ मिळेल तसा जोपासताना दिसत आहेत. क्षणाची विश्रांती आणि त्यातही आवडीचा छंद जोपासत वेळ जात असल्याने पोलिसांना पुढील कामासाठी प्रेरणा मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून पोलिसांवरील ताण कायम आहे. कोरोना उपाययोजनांमध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका पोलीस बजावत आहेत. बंदोबस्ताचे सुयोग्य नियोजन असले तरी कोरोना स्थितीमुळे चिंता वाढत आहे. यावर उपाय म्हणून पोलीस कर्मचारी आवर्जून आपला छंद जोपासत आहेत. यात अनेक जण आपल्या सुरेल आवाजातून गाणी म्हणूून, तर काही जण कागदावर चित्र रेखाटून आपला ताण कमी करीत आहेत. सोशल मीडियावर सकारात्मक संदेश देणारेही काही कर्मचारी आहेत. याशिवाय वेळ मिळेल तेव्हा आपल्या कुटुंबियांसमवेत गप्पांचा फड, तर सध्या बाहेर फिरणाऱ्यांवर निर्बंध असले तरी अगोदर काही कर्मचारी जवळपासच्या निर्सगरम्य ठिकाणी किंवा अगदी आपल्या शेतातही जाऊन रमत होते.

चौकट

पोलीस दलातील फॉरेन्सिक लॅबमध्ये कार्यरत असलेले संदीप लांडगे हे आपल्या आगळ्यावेगळ्या छंदासाठी ओळखले जातात. पोलीस असतानाही त्यांना इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस तयार करण्याची आवड असून, त्यांनी घरात कोणी नसताना दार उघडले गेल्यास मोबाइलवर कॉल येण्याचे यंत्र तयार केले आहे. असेच काही तरी नावीन्यपूर्ण ते आपला छंद म्हणून करीत असतात.

चौकट

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, समाजात आपल्या गायनातून प्रबोधन करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यातील अनंत होळकर पुढाकार घेत आहेत. आपल्या सुमधुर आवाजात आणि स्वरचित गाण्यांतून ते शहरात प्रबोधन करतात. ते आपला छंद म्हणूनच काम सांभाळून हे करीत असल्याचे सांगतात.

चौकट

सांगली पोलीस दलात कार्यरत असलेले मूळचे खरसुंडी येथील सचिन वसंत साळुंखे हे तबल्यासह इतर वाद्ये वाजविण्याचा आपला छंद जोपासत आहेत. उत्कृष्ट वादक म्हणून त्यांची ओळख आहे. वेळ मिळाला की घरात त्याचा सराव करण्याबरोबरच आपल्या मुलांनाही ते याचे शिक्षण देत आहेत. वादनातूनच समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असणारे मूळचे महादेव नागणे वेळ मिळाला की, करेओके सिस्टीमवर गायन करीत असतात. एलसीबीसारख्या आव्हानात्मक शाखेत काम करीत असतानाही आपल्या जिंदादिल स्वभावासाठी ते ओळखले जातात. त्यामुळेच घरी गेल्यानंतर मिळालेल्या प्रत्येक वेळी ते रफी, किशोर कुमार यांच्या गाण्यात रमून जातात.

Web Title: Hobby is also practiced in khaki uniform to reduce stress!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.