तासगावात आज ऐतिहासिक रथोत्सव
By Admin | Updated: September 18, 2015 00:07 IST2015-09-17T23:08:40+5:302015-09-18T00:07:38+5:30
तासगाव संस्थानच्या गणपतीची दीड दिवसाची ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्याचदिवशी विसर्जन करण्यात येते. या दिवशीचा रथोत्सवही ऐतिहासिक असतो.

तासगावात आज ऐतिहासिक रथोत्सव
तासगाव : तासगावचा २३६ वा पारंपरिक ऐतिहासिक रथोत्सव शुक्रवार, दि. १८ रोजी होत आहे. यासाठी तासगाव गणेशनगरी सज्ज झाली आहे. श्री गणपती पंचायतनच्यावतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. गणेशभक्तांची उसळणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे.मराठा साम्राज्याचे पेशवेकालीन सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांनी १७७९ ला या ऐतिहासिक रथोत्सवाची सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत गेली २३६ वर्षे अव्याहतपणे रथोत्सवाची ही परंपरा सुरू आहे. तासगावचा गणपती दीड दिवसाचा असतो. या गणपतीची विसर्जन मिरवणूक म्हणजेच रथोत्सव होय. यासाठी कर्नाटक, महाराष्ट्रासह सीमाभागातून हजारो गणेशभक्त हजेरी लावतात.तासगाव गणपती पंचायतनच्यावतीने विश्वस्त राजेंद्र पटवर्धन, निरंजन पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली रथोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने या रथोत्सवास सुरुवात होणार आहे. मंदिराची साफसफाई व रंगरंगोटी केली असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रथाच्या पुढे मानाने डोलणारा हत्ती येणाऱ्या गणेशभक्तांचे स्वागत करायला मंदिराबाहेर उभा आहे. तासगाव संस्थानच्या गणपतीची दीड दिवसाची ऐतिहासिक परंपरा आहे. गणपतीच्या स्थापनेनंतर दुसऱ्याचदिवशी विसर्जन करण्यात येते. या दिवशीचा रथोत्सवही ऐतिहासिक असतो. (वार्ताहर)
वाहतूक व्यवस्थेत बदल
राज्यभरातून येणाऱ्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी तासगाव पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत बदल केले आहेत. सांगली, मिरज व कवठेमहांकाळ येथून येणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहन पार्किंगची व्यवस्था नवीन तहसील कार्यालयासमोरील पटांगणात करण्यात आली आहे. आटपाडी, विटा, सावळज येथून येणाऱ्या वाहनांची चिंचणी रोड येथे, तर पाचवा मैल, भिलवडी, पलूस, तुरची येथून येणाऱ्या वाहनांसाठी भिलवडी नाका, दर्यावर्दी मंडळ, विद्यानिकेतन क्रीडांगण व जोतिबा मंदिर पाठीमागे व्यवस्था करण्यात आली आहे. एसटीसह इतर वाहने विटा नाका, बसस्थानक, सिद्धेश्वर चौक, भिलवडी नाका, बायपास ते वसंतदादा कॉलेज, सांगलीकडे त्याच उलट बाजूने बायपासने वळविण्यात आली आहेत.