महामार्गबाधित कृती समितीचा अंकली फाट्यावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:39+5:302021-06-30T04:17:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी ...

महामार्गबाधित कृती समितीचा अंकली फाट्यावर ठिय्या
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : इनाम धामणी ते मिरजदरम्यान फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करत ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. मंगळवारी सकाळी अंकली फाटा येथे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महामार्ग, महापूर बाधित कृती समितीने वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.
रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्ग इनामधामणी गावाला खेटून जात आहे. त्याच्या दुतर्फा भलीमोठी संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. पाटील यांनी सांगितले की, या भिंतीमुळे महापुराचे पाणी कृष्णेत परतण्यात अडथळे येणार आहेत. बॅकवॉटरमुळे संपूर्ण इनाम धामणी गाव पाण्याखाली जाणार आहे. शिवाय पुराचे पाणी सांगलीतही शिरण्याचा धोका आहे. सुमारे चार किलोमीटरपर्यंत रस्त्याची उंची सात फुटांपासून १३ फुटांपर्यंत वाढविण्यात येत असल्याने सांगलीकरांसमोर कृत्रिम महापुराचे संकट आहे. महामार्गासाठी एक प्रकारे बांध घालण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पात्रातून बाहेर पडणाऱ्या पाण्याला पुढे पुन्हा कृष्णा नदीत जाण्यासाठी अडथळा निर्माण होणार आहे. इनामधामणीसह सांगलीच्या विस्तारित भागालाही याचा धोका आहे.
याविरोधात इनाम धामणी, अंकली, निलजी बामणीसह आसपासच्या गावांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मंगळवारी सकाळी अंकली फाटा चौकात ठिय्या आंदोलन करून समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. रस्त्याची उंची वाढवण्याऐवजी अंकली ते मिरज या चार किलोमीटर अंतरात फ्लायओव्हर निर्माण करावा, अशी मागणी केली. तसे निवेदन मंडलाधिकारी श्रीकांत घाळे यांना देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
आंदोलनात विठ्ठल पाटील यांच्यासह पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, हरिपूरचे सरपंच विकास हणबर, आदिनाथ मगदूम, परशराम कोळी, महावीर पाटील, प्रदीप मगदूम आदी सहभागी झाले.
चौकट
पाइपचा पर्याय मलमपट्टी करणारा
पुराचे पाणी रस्त्याखालून पलीकडे जाण्यासाठी तीन ठिकाणी पाइप टाकणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले; पण पुराचे प्रचंड पाणी वाहून नेण्यासाठी ही पाइपलाइन पुरेशी नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाइप टाकून तात्पुरता मलमपट्टी म्हणजे वेळ काढण्याचा प्रकार आहे. पाइप टाकण्याने पुराची तीव्रता कमी होणार नाही, हे अधिकाऱ्यांनाही माहिती असल्याचे आंदोलकांनी सांगितले.