धरणग्रस्तांसाठी महामार्ग रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2016 00:37 IST2016-01-17T00:21:13+5:302016-01-17T00:37:27+5:30
वाघवाडीत रास्ता रोको : पाठिंब्यासाठी आंदोलन तीव्र होणार

धरणग्रस्तांसाठी महामार्ग रोखला
पेठ : धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी गेले सहा दिवस चांदोली (ता. शिराळा) येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे-बंगलोर महामार्गावरील वाघवाडी (ता. वाळवा) फाट्यावर शनिवारी रास्ता रोको करण्यात आला. युवक काँग्रेसचे माजी वाळवा तालुकाध्यक्ष नजीर वलांडकर यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी गेल्या सहा दिवसांपासून धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांसाठी लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याला पाठिंबा म्हणून वलांडकर यांनी वाघवाडी फाट्यावर महामार्ग रोको केला. सकाळी अकरा वाजता कार्यकर्ते वाघवाडी फाट्यावरील शेतकी कार्यालयापासून महामार्गापर्यंत हातात बॅनर घेऊन घोषणा देत आले. प्रारंभी पोलिसांनी वलांडकर यांच्यासह आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांना न जुमानता त्यांनी २० मिनिटे महामार्ग रोखून धरला. यावेळी वाहतूक ठप्प झाली होती.
वलांडकर म्हणाले की, धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर शासनाने आता झोपेचे सोंग घेऊ नये. निद्रिस्त शासकीय यंत्रणेला जागे करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन चालू आहे, त्यास आमचा पाठिंबा आहे.
यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेऊन सोडून दिले. यावेळी विक्रम शिंदे, संजय अहिर, नितीन घबक, नंदू पाटील, भगवान पाटील, सावकर कदम, गजानन पाटील, अशोक जाधव, शंकर जाधव, बाजीराव नायकवडी, उमेश घोरपडे, दत्तात्रय चव्हाण, संजय अहिर, विक्रम शिंदे, प्रताप शिंदे उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (वार्ताहर)