महामार्गालगत शेतकऱ्यांना रस्त्यासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:57+5:302021-05-23T04:26:57+5:30
मिरज : मिरज -रत्नागिरी - नागपूर महामार्गालगतच्या वड्डी येथील शेतकऱ्यांना सर्व्हिस रोड व भुयारी रस्त्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता ...

महामार्गालगत शेतकऱ्यांना रस्त्यासाठी आंदोलन
मिरज : मिरज -रत्नागिरी - नागपूर महामार्गालगतच्या वड्डी येथील शेतकऱ्यांना सर्व्हिस रोड व भुयारी रस्त्यासाठी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी यांना दिला आहे.
वड्डीलगत महापालिकेच्या हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. महामार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन भाग होऊन रस्त्याच्या दुतर्फा शेती शिल्लक राहिलेली आहे. या शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णपणे बागायती असल्याने इरिगेशन पाइपलाइनही रस्त्याखालून गेल्या आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी किंवा विहीर व कूपनलिकेच्या शेती पंपांच्या मोटारी चालू बंद करण्यासाठी ये-जा करावी लागते. त्यासाठी भुयारी मार्गाची आवश्यकता आहे. या जमिनी मिरज - म्हैसाळ रस्ता व मिरज ते बेळगाव रेल्वे लाइनच्या दुतर्फा आहेत. येथील सर्व शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता मिळणे गरजेचे आहे. महामार्गासाठी म्हैसाळ रस्त्यावर व रेल्वे लाइन वर ओव्हरब्रीज बांधण्यात येत असून या दोन्ही ब्रीजना जोडण्यासाठी १० ते १२ मीटर उंचीचा मुरमाचा भराव करण्यात येणार आहे. रेल्वे लाइनच्या दोन्ही बाजूस स्लोपिंग करून सर्व्हिस रस्ता बंद केल्याने शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता बंद होणार आहे. महामार्गालगत शेतकऱ्यांसाठी सर्व्हिस रोड व भुयारी रस्ता करावा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे संभाजी मेंढे यांनी दिला आहे.
यावेळी अर्जुन महाडिक, रामा साखरे, लक्ष्मण मोरे, दत्तात्रय शिंगाणा, बाळासाहेब शिंगाणा यांच्यासह ४० शेतकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.