मिरजेत उंच गणेशमूर्तींची स्पर्धा...
By Admin | Updated: September 1, 2014 23:50 IST2014-09-01T23:15:22+5:302014-09-01T23:50:16+5:30
उत्साहाला उधाण : मूर्तीसह सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दी, विद्युत रोषणाईने रस्ते झगमगले

मिरजेत उंच गणेशमूर्तींची स्पर्धा...
मिरज : मिरजेत सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध आकारातील उंच गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. मंडळांनी साकारलेले प्रबोधनपर सजीव देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
मिरजेत सुमारे चारशेवर मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. बहुसंख्य मंडळांच्या उंच व भव्य गणेशमूर्ती आहेत. गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे. उदगाव वेस येथील सर्वोदय गणेश मंडळाचे यावर्षी ५० वे वर्ष आहे. मंडळाने छत्रपती शिवाजी महाराज युध्दात जिंकल्यानंतर स्त्रियांचा सन्मान व संरक्षण करण्याचे संदेश देत असल्याचा सजीव देखावा केला आहे. नदीवसे येथील शिवाजी तरुण मंडळाने ‘शैक्षणिक भ्रष्टाचार’ या विषयावर सजीव देखावा साकारला आहे. नदीवेस पवार गल्ली गणेश मंडळानेही सामाजिक विषयावर प्रबोधनपर देखावा केला आहे. लोणार गल्ली गणेश मंडळाची हनुमानाच्या गदेवर विराजमान असलेली गणेशमूर्ती आहे. सांगलीवेस येथील कैकाडी गल्ली गणेश मंडळाची गणेशाच्या वाहनाचे उंदीर सारथ्य करीत असलेली मूर्ती आहे. कमानवेस येथील भारतमाता गणेश मंडळाची डमरूच्या दोरीवरील गणेशमूर्ती आहे. मंगळवारपेठचा राजा गणेशमंडळाची २१ फूट उंच लालबागचा राजाची प्रतिकृती आहे. कुंकूवाले गल्लीतील कुंकूवाले गणेश मंडळाची उंच आकर्षक गणेशमूर्ती आहे. मंगळवार पेठेतील गजराज गणेश मंडळाची गणेशमूर्ती चांदीच्या अलंकारांनी सजविण्यात आली आहे.
वेताळनगर येथील नवरंग गणेश मंडळाची शिवलिंगासह गणेशमूर्ती आहे. कैकाडी गल्लीतील संत कैकाडी गणेश मंडळाची सरस्वतीसह गणेशमूर्ती आहे. कमान वेस येथील त्रिमूर्ती गणेश मंडळाची शेषनागावरील गणेशमूर्ती आहे. स्वस्तिक गणेश मंडळाची मोरपंखातील गणेशमूर्ती आहे. मंगळवार पेठेतील
श्री गणेश मंडळाने गरूडासनावर विराजमान गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. ब्राह्मणपुरीतील शिवनेरी चौक गणेश मंडळाची तलवारधारी गणेशमूर्ती आहे. अनेक मंडळांची सजीव देखावे खुले करण्याची तयारी सुरू आहे. पाचव्या दिवसापासून बहुसंख्य मंडळांचे देखावे सुरू होण्याची शक्यता आहे. दररोज पावसाची हजेरी असली, तरी गणेश मंडळांचे कार्यकर्ते उत्साहात आहेत. (वार्ताहर)
कोठे काय पहाल...
बसस्थानक परिसर :१.रणझुंझार मंडळ : संत नामदेव २.मास्टर दीनानाथ चौक : माळीण दुर्घटनेवर चित्रफित
रिसाला रस्ता : हिराबाग कॉर्नर : मंदिर सुशोभिकरण
वखारभाग : १. मोटर-मालक : कुंभकर्ण निद्रा २. लक्ष्मीनारायण : गजेंद्रमोक्ष ३. वखारभाग मित्रमंडळ : तुकाराम महाराजांचे भजन.
कापडपेठ : कापडपेठ मंडळ : अहिल्योध्दार
कॉलेज कॉर्नर : १. सावकार गणपती : सुवर्ण मंदिर २. शहीद भगतसिंग : बालाजी मंदिर
गावभाग: १. संग्राम चौक : बाल गणेश नृत्य. २. विवेकानंद : शिवरायांचा आदर्श राज्यकारभार
मारुती रस्ता : १. विजयंत मंडळ :दाक्षिणात्य पध्दतीचे मंदिर. २. झुंझार चौक : महादेवाला अभिषेक. 3. खोकी मालक संघटना : सर्वधर्मसमभाव
मार्केट यार्ड : मार्केट यार्ड मंडळ : शंकासूर वध
पटेल चौक : पटेल चौक मित्रमंडळ: कालिमातेचे रौद्र रूप
गणपती पेठ : १. व्यापारी गणेश मंडळ : डायनासोर २. झाशी चौक : जय मल्हार
राजवाडा परिसर : मित्रमंडळ चौक : लेसर शो कारंजा
४विश्रामबाग : श्री गणेशोत्सव : रेन वॉटर हार्वेस्टिंग
चांदणी चौक : जय हनुमान : रक्तदानाचे महत्त्व