भाजपमध्ये राहून ‘त्या’ नेत्याकडून विरोधकांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:21+5:302021-06-29T04:19:21+5:30

सांगली : वैयक्तिक व्यवहारातून वैयक्तिक संबंध बिघडत असतात, त्यात पक्षाचा काही संबंध नसतो. अन्य पक्षात जाण्याविषयी सदस्यांना काेण भडकावत ...

Helping the opposition from 'that' leader by staying in BJP | भाजपमध्ये राहून ‘त्या’ नेत्याकडून विरोधकांना मदत

भाजपमध्ये राहून ‘त्या’ नेत्याकडून विरोधकांना मदत

सांगली : वैयक्तिक व्यवहारातून वैयक्तिक संबंध बिघडत असतात, त्यात पक्षाचा काही संबंध नसतो. अन्य पक्षात जाण्याविषयी सदस्यांना काेण भडकावत आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे भाजपमध्ये राहून असे नेते विरोधकांच्या सोयीची भूमिका घेत आहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी खा. संजयकाका पाटील यांच्यावर प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

जिल्हा परिषद सदस्य नितीन नवले यांनी जिल्हाध्यक्षांशी असलेल्या वैयक्तिक वादातून पक्ष सोडल्याचे मत खासदार पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते. त्यावर खुलासा करताना देशमुख यांनी म्हटले आहे की, भाजप कोणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही. या पक्षात सामूहिक नेतृत्व चालते. कोणताही निर्णय कोअर कमिटी घेत असते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा निर्णयसुद्धा कोअर कमिटी घेईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाचे एबी फॉर्म अधिकृत उमेदवारांना कोणी दिले नाहीत? निवडणुकीनंतर अध्यक्षपदाच्या निवडीवेळी श्रेष्ठींचा आदेश डावलण्याचा प्रयत्न कोणी केला? याबाबत सविस्तर अहवाल वरिष्ठांना कोअर कमिटीने पाठविला आहे. महापालिका निवडणुकीतही वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न याच मंडळींनी केला.

प्रत्येक निवडणुकीत भाजपमध्ये राहून विरोधकांच्या सोयीची भूमिका कोण घेत आहे, हे सर्वांना माहीत आहे. विरोधकांना हवीशी भूमिका घेऊन स्वार्थ साधण्याचे काम ते करीत आहेत. भाजपच्या सदस्यांना पक्षाच्या विरोधात भडकविण्याचे काम कोण करीत आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पलूस-कडेगाव मतदारसंघातही असा प्रयत्न सातत्याने सुरू असतो, असे त्यांनी म्हटले आहे.

चौकट

षडयंत्र चालू देणार नाही

पक्षविरोधी काम करणाऱ्यांबद्दल पक्ष योग्य ती दखल लवकरच घेईल. कोणाच्या तरी आडून काेणाला तरी बदनाम करायचे, हे षडयंत्र फार काळ चालू देणार नाही. जे पक्ष सोडून गेले अशा गद्दारांना लोक त्यांची जागा दाखवतील, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

Web Title: Helping the opposition from 'that' leader by staying in BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.