विलगीकरण केंद्रांना सामाजिक बांधीलकी म्हणून मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:30+5:302021-06-03T04:19:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी ...

विलगीकरण केंद्रांना सामाजिक बांधीलकी म्हणून मदत करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : सध्या कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांच्या सहकार्याने संस्थात्मक विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून आर्थिक मदत किंवा आवश्यक वस्तू देण्यात याव्यात, असे आवाहन आमदार अरुण लाड यांनी केले.
चिंचणी (ता. कडेगाव) येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रास ५० पीपीई किट दिले. यावेळी मास्क, हातमोजे व सॅनिटायझर अशा सुरक्षा साधनांचेही वाटप करण्यात आले. यावेळी आमदार अरुण लाड बोलत होते.
यावेळी चिंचणी येथील उपसरपंच दीपक महाडिक, नंदकुमार माने, वैभव पवार उपास्थित होते.
अरुण लाड म्हणाले, गावात रहिवासी असलेल्या नागरिकांबरोबरच मोठ्या शहरांमध्ये किंवा अन्य ठिकाणी नोकरी-व्यवसायानिमित्ताने गेलेल्या लोकांनीही विलगीकरण केंद्रासाठी सढळ हाताने मदत करणे गरजेचे आहे. आपण गावासाठी संकटकाळात मदतीची आणि सामाजिक बांधीलकीची भावना जपली पाहिजे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत माने, अशोक महाडिक, वैभव माने, सुनील पाटील, इकबाल मुल्ला, श्रीकांत माने, आदी उपस्थित होते.
चौकट
फ्रंटलाईन वर्कर्सचीही सुरक्षा महत्त्वाची
विलगीकरण केंद्रासाठी काम करणारे डॉक्टर, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक यांनी पीपीई किटचा वापर करावा. यामुळे सुरक्षितता मिळण्यास मदत होणार आहे. फ्रंटलाईन वर्कर्सची सुरक्षा आणि त्यांचा जीव वाचविणे गरजेचे आहे. या भावनेतून पीपीई किट भेट दिले आहेत, असे आमदार अरुण लाड यांनी सांगितले.