With the help and rehabilitation of Sangli district, sanitation works on the battlefield | सांगली जिल्ह्यामध्ये मदत व पुनर्वसनाबरोबरच स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर

सांगली जिल्ह्यामध्ये मदत व पुनर्वसनाबरोबरच स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर

ठळक मुद्देसांगली जिल्ह्यामध्ये मदत व पुनर्वसनाबरोबरच स्वच्छतेचे काम युध्दपातळीवरजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली माहिती

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये उदभवलेल्या अभूतपूर्व पूरस्थितीनंतर प्रशासनाच्या वतीने मदत व पुर्नवसनाच्या कामाबरोबरच पूरग्रस्त भागात स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कामात प्रशासनास स्वयंसेवी संस्था व इतर नागरिकांचेही सहकार्य लाभत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले, सांगली शहरासह जिल्ह्यातील पलूस, वाळवा, मिरज व शिराळा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पुरामुळे सुमारे १०४ गावे बाधित झाली. बाधित गावातील काही व्यक्तींनी नातेवाईक किंवा अन्य ठिकाणी स्थलांतर केले होते. तर उर्वरित सर्व कुटूंबांना प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये राहण्याची सोय करण्यात आली.

या कॅम्पमधील व्यक्तींना कपडे, अन्न, पाणी, सॅनिटरी नॅपकिन, औषधे, टॉयलेटची सोय उपलब्ध करून देण्यात आली. ‍शिवाय त्यांना दैनंदिन वापराचे साहित्य जनावरांना चारा, प्रशासन व इतर संस्थांच्या माध्यमातून पुरविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महापुरामुळे एकूण २७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यापैकी १९ मयत व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख सानुग्रह अनुदान व मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी १ लाख असे एकूण ५ लाख प्रमाणे ९५ लाख आणि आजअखेर अन्य ४ मयत व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान प्रत्येकी ४ लाख रूपये असे एकूण १ कोटी ११ लाख रूपये अनुदान वितरीत करण्यात आले आहे. तसेच ६ मयत व्यक्तींच्या वारसांना १ लाख प्रमाणे मुख्यमंत्री सहायत निधीतून अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यात ८७ हजार ९३९ पूरबाधित कुटूंबातील गाय व म्हैस २६०, मेंढी, बकरी डुक्कर ९८, उंट, घोडा, बैल ५, वासरू, गाढव, शेंगरू, खेचर ९१ आणि २३ हजार ८४८ कोंबड्या व इतर पक्षी यांचे नुकसान झाले असून नुकसानीची अंदाजित रक्कम ९४ लाख ८४ हजार ४५० रूपये इतकी आहे.

पुरामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत पूर्णत: पडझड झालेल्या घरांची एकूण संख्या ६७४ आढळून आली असून अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या ३ हजार ४३१ आढळून आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील एकूण १०१ गोठ्यांना पण पुराची बाधा झाली आहे.

जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी ५ हजार या प्रमाणे आतापर्यंत १३ कोटी ९२ लाख एवढी रक्कम वाटप करण्यात आली आहे. सांगली शहरासह पलूस, वाळवा, मिरज व शिराळा येथील पुरपरिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व नुकसानीचे पंचनामे, तसेच अनुदान वाटप करण्यासाठी इतर तालुक्यातून व जिल्ह्यातून अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पुरबाधित कुटूंबांना तातडीची मदत म्हणून प्रत्येक कुटूंबास ५ हजार रूपये रोख रक्कम देण्यात येत असून उर्वरित रक्कम त्यांच्या बँकेचया खात्यात जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०४ गावातील ग्रामीण भागातील ४५ हजार २९३ कुटूंबे व शहरी भागातील ४२ हजार ६४६ कुटूंबे बाधित झाली होती. त्यापैकी ग्रामीण भागातील १९ हजार १३९ व शहरी भागातील ८ हजार ७०१ कुटूंबांना एकूण १३ कोटी ९२ लाख एवढे अनुदान वाटप करण्यात आले असून अजूनही पंचनामे व अनुदान वाटप सुरू आहे. पूरबाधित सर्व गावांमध्ये वाटप सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पुरबाधित कुटूंबांचा सर्व्हे करून त्यांना धान्य वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पूरबाधित कुटूंबांना शासन निर्णयानुसार प्रत्येक कुटूंबाला १० किलो गहू व १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसीन मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार आतापर्यंत १८ हजार ९२३ कुटूंबांना एकूण १८९२.३ क्विंटल गहू व १८९२.३ क्विंटल तांदूळ मोफत वाटप करण्यात आले असून उर्वरीत पूरबाधितांना मोफत धान्य वाटपाची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात २२ केरोसिन टँकर उपलब्ध असून प्रत्येक तालुक्यास २ टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून आजअखेर केरोसीन (५ लिटर) प्रमाणे ८ हजार ४५५ लिटर इतके वाटप करण्यात आले आहे.

डॉ. चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असून जिल्हाधिकारी कार्यालयात ही मदत स्वीकारण्यासाठी मदत स्वीकृती केंद्र व वितरण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या कक्षामध्ये १ अप्पर जिल्हाधिकारी, १ तहसिलदार, ३ नायब तहसिलदार व इतर कर्मचारी २४ तास कार्यरत असून मदत स्विकार व वितरण करण्याचे काम करत आहेत.

या कामामध्ये एनएसएस चे ६० विद्यार्थी, एनसीसी चे १०० विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्थांचे ५० स्वयंसेवक यांच्या मदतीने एकूण ३० वस्तूंचे किट बनविण्याचे काम चालू आहे. यामध्ये जितो संस्था मुंबई यांच्याकडून ८ हजार भांड्याची किट प्राप्त झाली असून त्याला पूरक अशा इतर वस्तूंचे ८ हजार किट बनविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. हे किट जसजसे तयार होतील तसे ते पुरबाधित कुटूंबांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पशुसंवर्धन वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई व पशुसंवर्धन वैद्यकीय महाविद्यालय मुंबई माजी विद्यार्थी संघटना यांची टीम आणि सांगली पशुसंवर्धन विभाग यांनी १२०० मृत पक्षी व १५ मृत जनावरे यांची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावलेली आहे.

पुरबाधित जनावरांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड यांच्याकडून ५ टन ओला चारा प्राप्त झालेला असून तो मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज येथे वाटप केलेला आहे. महाड उत्पादक संघटना यांच्याकडून २० टन पशुखाद्य प्राप्त झाले असून ते पशुखाद्य मिरज तालुक्यातील कृष्णाघाट, डिग्रज, पदमाळे आणि पलूस तालुक्यास १० टन पाठविण्यात आले आहे.

रत्नागिरी पशुसवंर्धन विभाग यांच्याकडूनही ओला चारा प्राप्त झाला असून तो वाळवा तालुक्यास पुरविण्यात आला आहे. मृत जनावरांची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी महाड उत्पादक संघटना यांच्याकडून २ ट्रक मिठ प्राप्त झाले असून ते मिरज, पलूस, इस्लामपूर व महानगरपालिका यांना पुरविण्यात आले आहे.

पुरबाधित १२५ गावांच्या पाणीपुरवठा योजनांपैकी ९८ पाणीपुरवठा योजना पुरपरिस्थितीमुळे बंद होत्या. त्यापैकी सद्या ६७ पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पुरग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाभरात ४८ गावांसाठी एकूण ६० टँकर उपलब्ध करून देण्यात आले असून ६ खाजगी बोअर / विहीरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. शिवाय २१ जलशुध्दीकरण संयंत्र कार्यान्वित करण्यात आल्या आहे. पुरबाधित गावातील एकूएण ४५ हातपंप दुरूस्त करण्यात आले असून ४८ हातपंपाचे शुध्दीकरण करण्यात आले आहे.

पुरामुळे जिल्ह्यातील एकूण २३४ गावांतील ६६०९८.५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यापैकी १२६४६.३३ हेक्टर क्षेत्रांचा पंचनामा करण्यात आला आहे. बाधित शेतकऱ्यांची १ लाख २० हजार २३१ इतकी संख्या असून त्यापैकी २७ हजार ६९७ शेतकऱ्यांच्या क्षेत्राचा पंचनामा पूर्ण झाला आहे. उर्वरित क्षेत्राचा पंचनामा सुरू आहे. अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील ६६०९८.५० हेक्टर क्षेत्रातील केळी, हळद इतर खरीप पिके, चारा, पपई, द्राक्ष, पेरू या पिकांचे ७८९०.०५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील महापूराची परिस्थिती ओसरत असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू नये व साथीच्या आजारांचा फैलाव होवू नये यासाठी जिल्ह्याभरात एकूण २३८ वैद्यकीय पथके स्थापन करण्यात आली असून त्यापैकी महानगरपालिका क्षेत्रात १०४ व ग्रामीण भागात १३४ पथके कार्यरत आहेत. ८० गावामध्ये ४५ वैद्यकीय उपचार पथके स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये १ वैद्यकीय अधिकारी, १ आरोग्य सेविका, २ आरोग्य सेवक व अंगणवाडी सेविका यांचा समावेश आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली यांच्या नियंत्रणाखाली इतर जिल्ह्यामधून वैद्यकीय पथक, मनुष्यळ उपलब्ध करून ५१ कॅम्पच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आवश्यकत ती वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे.

सांगली शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्रातील सांगली मधील ७ प्रभाग व मिरज मधील २ प्रभाग असे एकूण ९ पूरबाधित प्रभागामध्ये ६३ पुनर्वसन केंद्राची सोय करण्यात आली होती. या केंद्रासाठी मनपाकडील २२ डॉक्टरांची पथके, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील १८ पथके, आयएमए व निमा अंतर्गत ६३ डॉक्टर्स व एचएलएल १२ प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध करून देण्यात आले होते. या पथकामार्फत आतापर्यंत ७ हजार ३९६ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अद्यापही १६ कॅम्प कार्यरत आहेत.

आतापर्यंत एकूण २९ हजार ७६४ जनावरांना लसीकरण करण्यात आलेले असून १७ हजार ३९ जनावरांवर उपचार करून त्यांना २००.५ टन पशुखाद्य व १ हजार ७७९ मेट्रीक टन इतका चारा वाटप करण्यात आला आहे. पुरबाधित क्षेत्रातील एकूण ७३ रस्त्याचे १८६२५ लाख रूपयांचे नुकसान झाले असून जिल्ह्यातील ४८४ कि.मी. रस्त्याला पुराची झळ पोहचली आहे. पुरामुळे १३ गावातील २२ हजार ९२७ ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत झाला होता.

पुरपरिस्थितीमुळे पंचनामे व इतर कार्यासाठी जिल्हा बाहेरील १ अपर जिल्हाधिकारी, ५ उपजिल्हाधिकारी, ६ तहसिलदार, १६ नायब तहसिलदार, १६ मंडळ अधिकारी, ४७ तलाठी, ५ लिपीक व २० अभियंते उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पुरामुळे निर्माण झालेला चिखल व गाळ काढण्यासाठी आणि स्वच्छता करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून १, पंढरपूर नगरपरिषदेकडून १ अशा २ जेटींग मशिन उपलब्ध झाल्या असून त्याव्दारे स्वच्छतेचे काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

 

Web Title: With the help and rehabilitation of Sangli district, sanitation works on the battlefield

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.