अपघातातील मृताच्या वारसांना मिळाली एक कोटी सात लाखांची नुकसान भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:51+5:302021-02-05T07:20:51+5:30
इस्लामपूर : चार वर्षांपूर्वी येडेमच्छिंद्र गावच्या हद्दीत टेम्पोची धडक बसून ठार झालेल्या ३७ वर्षीय अभियंत्यांच्या वारसाला टेम्पोमालक आणि चालकाने ...

अपघातातील मृताच्या वारसांना मिळाली एक कोटी सात लाखांची नुकसान भरपाई
इस्लामपूर : चार वर्षांपूर्वी येडेमच्छिंद्र गावच्या हद्दीत टेम्पोची धडक बसून ठार झालेल्या ३७ वर्षीय अभियंत्यांच्या वारसाला टेम्पोमालक आणि चालकाने एक कोटी सात लाख ६४ हजार २७९ रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश येथील मोटार अपघात लवादाचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी दिले. तसेच हा दावा दाखल झाल्यापासून या रकमेवर सहा टक्के व्याज देण्याचेही निर्देशही त्यांनी दिले.
विक्रम भीमराव हुतुते (वय ३७, रा. शिरटे, ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या अभियंत्यांचे नाव आहे. ते पुणे येथील एका कंपनीत अधिकारी होते. १४ फेब्रुवारी २०१७ रोजी ते आपल्या मित्रांसमवेत दुचाकीवरून कऱ्हाड येथून शिरटे गावी येत होते. यावेळी शेरे (ता. कऱ्हाड) येथील सयाजी मुरलीधर निकम यांच्या मालकीचा टेम्पो (एमएच ५०- ५९०९) हा चालक संतोष सर्जेराव निकम चालवत होता.
येडेमच्छिंद्र गावाच्या हद्दीत चालक संतोष निकम याने भरधाव वेगात निष्काळजीपणे वाहन चालवत हुतुते यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये हुतुते यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पत्नीने येथील मोटार अपघात लवादासमोर दावा दाखल केला होता. या दाव्याची सुनावणी न्या. मुनघाटे यांच्यासमोर झाली. मृताच्या वारसातर्फे अॅड. अमोल जयप्रकाश पाटील (पेठ) यांनी काम पाहिले.
चौकट
हेल्मेटसाठी ११ लाख ९६ हजारांची कपात
न्यायालयाने या दाव्याचा निकाल देताना एकूण १ कोटी १९ लाख ६० हजार ३१० रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली होती. मात्र सुनावणी दरम्यानच्या युक्तिवादात अपघातावेळी मृत विक्रम हुतुते यांनी हेल्मेट परिधान न केल्याच्या मुद्द्याकडे लक्ष वेधत न्यायालयाने वरील रकमेतील १० टक्के इतकी ११ लाख ९६ हजार ३१ रुपयांची रक्कम कपात केली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दुचाकी चालविताना हेल्मेटच्या वापराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.