वादळी पावसाने झोडपले
By Admin | Updated: May 19, 2016 00:22 IST2016-05-18T23:49:13+5:302016-05-19T00:22:54+5:30
बेळंकी परिसरात गारपीट : मिरज पूर्व, कवठेमहांकाळला पाऊस

वादळी पावसाने झोडपले
सांगली : मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्यातील पश्चिम भाग आणि जतला बुधवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह वळीव पावसाने झोडपून काढले. तासभर झालेल्या पावसाने लाखोंचे नुकसान झाले. पलूस, तासगाव, कडेगाव, विटा परिसरातही पाऊस झाला. असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्याने दिलासा दिला.
बुधवारी सकाळपासून तापमानात प्रचंड वाढ झाली होती. सायंकाळी चार वाजता ढगाळ वातावरण तयार झाले आणि वादळी वारा, ढगांचा गडगडाट होऊन पाऊस सुरू झाला.
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पाणीच पाणी झाल्याने सायंकाळी सातपर्यंत म्हैसाळ-कागवाड रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. म्हैसाळ बसस्थानकाजवळील मेंढपाळांचे शेड वाऱ्यामुळे उडून गेले. त्यामध्ये मारुती कनके, विद्याधन गुपचे, संभा कनके यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. कागवाड रस्त्यावर पत्र्याचे शेड व गोदामे आहेत. जोरदार वाऱ्यामुळे येथील पत्र्याची पाच शेड व दोन गोदामे उद्ध्वस्त झाली. यामुळे आप्पा बागडी, अजय बागडी, साळू बागडी, अर्जुन बागडी, संतोष बागडी यांचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. भाजी मंडई, बसस्थानक परिसरातील फलक वाऱ्याने उडून गेले, तर काही घरांच्या मातीच्या भिंती पडल्या. तसेच मोलमजुरीसाठी गावात आलेल्या १५ कुटुंबांच्या झोपड्या उद्ध्वस्त होऊन त्यांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.
लिंगनूर : मिरज पूर्व भागातील बेळंकी, लिंगनूर परिसरालाही जोरदार वाऱ्यासह पावसाने झोडपले. तासभर सुरू असलेल्या पावसात १० ते १५ मिनिटे गाराही पडल्या. तासभर दमदार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पाणी साचले होते. बेडग, खटाव परिसरालाही पावसाने झोडपले. बेडग येथे रानांमध्ये पाणी साचले, तर खटाव येथील यादव वस्तीवरील महादेव पाटील यांची द्राक्षबाग जोराच्या वाऱ्याने कोसळली. त्यात चार लाखांचे नुकसान झाले.
मिरज : मिरज परिसरात सायंकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शहरात अनेक भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला. ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली होती. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने काही भागात अंधाराचे साम्राज्य होते. काही सखल भागात पाणी साचले होते.
देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्याच्या पश्चिम भागातील देशिंग, खरशिंग, हरोली, बनेवाडी परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. रांजणी, धुळगाव येथील घरांचे पत्रे उडाले. सुमारे अर्धा तास पडलेल्या सरींनी सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. काडी तयार करण्यासाठी द्राक्षबागांना या पावसाचा उपयोग होणार आहे.
विटा : विटा शहरासह तालुक्यात साडेसातच्या सुमारास १५ ते २० मिनिटे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. चिंचणी मंगरूळ, बामणी, मंगरूळ, पारे, आळसंद, बलवडी, भाळवणी, लेंगरे, भूड, माहुली, माधळमुठी, देविखिंडी, खानापूर, आदी गावांमध्ये तुरळक पाऊस पडला. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. पावसामुळे वीजप्रवाह खंडित करण्यात आला होता.
पलूस : पलूस तालुक्यात सायंकाळी दहा मिनिटे हलक्या सरी पडल्या. तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. दिवसभर उष्णतेत वाढ झाली होती; पण पाऊस पडत नव्हता. बुधवारी अचानक पावसास सुरुवात झाली. अवघ्या दहा मिनिटांत पाऊस थांबल्याने उष्णतेत आणखी वाढ झाली.
रात्री उशिरा तालुक्यात ठिकठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला. शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
कडेगाव : कडेगाव तालुक्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. क डेगाव, कडेपूर, वांगी, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, आसद, पाडळी, सोनकिरे, तडसर, आदी गावांना मुसळधार पावसाने झोडपले. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर काही ठिकाणी केळीच्या बागा भुईसपाट झाल्या. आडसाली लावलेले उसाचे फडही भुईसपाट झाले. रस्त्यावर तसेच नाल्यांमधून पावसाचे पाणी वाहत होते.
एरंडोली : एरंडोली (ता. मिरज) येथे झाडे उन्मळून पडल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचे, गोठ्यांचे पत्रे उडाले. एरंडोली, व्यंकोचीवाडी परिसरात मध्यम स्वरूपाचा, तर मल्लेवाडी, गणेशनगर परिसरात वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. यामुळे परिसरातील
आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
म्हैसाळ (ता. मिरज) येथे बुधवारी पावसामुळे पालांवरील संसार उघड्यावर पडले.
म्हैसाळ (ता. मिरज) येथे वादळी पावसामुळे झाडे उन्मळून, मोडून पडली.
जत तालुक्यात सहा जखमी; सोनलगीत शाळेचे नुकसान