जिल्ह्यात सर्वत्र धुवांधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:13+5:302021-06-18T04:18:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धुवांधार पाऊस झाला. चोवीस तासात इस्लामपूर आणि ...

Heavy rain everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र धुवांधार पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र धुवांधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात बुधवारी रात्री ते गुरुवारी सकाळपर्यंत सर्वत्र धुवांधार पाऊस झाला. चोवीस तासात इस्लामपूर आणि सांगली परिसरात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसाचा जोर वाढल्याने नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी वाढली असून, काही पूल पाण्याखाली गेले आहेत.

बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी दिवसभर पावसाची रिपरिप कायम राहिली. इस्लामपूरमध्ये चोवीस तासांत ११० मिलिमीटर, तर सांगलीत ८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. शिराळा, पलूस, कडेगाव व मिरज तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांवरील रस्ते पाण्याखाली गेले. नद्या, नाल्यांमधील पाणीपातळी रातोरात वाढली. सांगली, मिरज शहरे जलमय झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. तापमानात मोठी घट झाली आहे. नदीच्या पाणीपातळीतही वाढ होत असून, सांगलीतील पाणीपातळी सध्या सात फुटांवर गेली आहे.

चौकट

धरणांमधील साठ्यात माेठी वाढ

चोवीस तासांत धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाल्यामुळे पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली. कोयना धरणात चोवीस तासांत २.९६ टीएमसीने तर वारणा धरणात १.५१ टीएमसी पाणीसाठा वाढला. कोयना धरण क्षेत्रात १९२ मिलिमीटर, तर वारणा धरण क्षेत्रात ९७ मिलिमीटर पाऊस झाला. धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे.

चौकट

पावसाचे जिल्ह्यातील चित्र

सांगली, मिरज शहरे जलमय झाली

शिराळा तालुक्यात येळापूर ते समतानगर मार्गावरील पूल बुधवारी रात्रीपासून पाण्याखाली गेला

कडेगाव तालुक्यात चिंचणी तलावात पाणी वाढल्याने येथील एक आपत्कालीन दरवाजा उघडण्यात आला.

वाळवा तालुक्यात वाटेगाव येथील भोगावती नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

वाळवा तालुक्यातील तिळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

आटपाडी व जत तालुक्यांत पावसाचा जोर कमी आहे.

चौकटी

जिल्ह्यातील पाऊस मि.मी. (चोवीस तासांतील नोंद)

सांगली ८१.८

मिरज ५१.५

तासगाव ४४

कवठेमहांकाळ १५.८

शिराळा ६४.५

कडेगाव ५९.८

पलूस ५३.५

विटा २६.५

आटपाडी ७.८

जत ३.२

Web Title: Heavy rain everywhere in the district