वसंतदादा बॅँक घोटाळ््याची सुनावणी १५ एप्रिल रोजी
By Admin | Updated: March 31, 2015 00:26 IST2015-03-30T23:16:52+5:302015-03-31T00:26:12+5:30
कागदपत्रांची मागणी सुरूच : ३४ माजी संचालकांची हजेरी

वसंतदादा बॅँक घोटाळ््याची सुनावणी १५ एप्रिल रोजी
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी महाराष्ट्र सहकारी अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार चौकशीस गेल्या महिन्याभरापासून सुरुवात झाली आहे. आज (सोमवारी) माजी संचालकांच्या सुनावणीवेळीही कागदपत्रांच्या मागणीचाच विषय होता. त्यामुळे कर्मचारी आणि माजी संचालकांची येत्या १५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे, अशी माहिती चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी दिली. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात अनेक १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी यास स्थगिती दिली होती. विद्यमान सहकारमंत्र्यांनी याप्रकरणी तत्कालीन माजी संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी देऊन यावरील स्थगिती उठविली. त्यानुसार चौकशीस सुरुवात झाली आहे. १७० कोटी रुपयांच्या नियमबाह्य कामांमध्ये ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. बहुतांश माजी संचालक व कर्मचाऱ्यांनी लेखापरीक्षण अहवाल व संबंधित कागदपत्रांच्या मागणीचे अर्ज पहिल्या सुनावणीवेळी सादर केले होते. दुसऱ्या सुनावणीवेळीही अजून कागदपत्रांचाच विषय सुरू असल्याने १५ एप्रिल रोजी माजी संचालक व कर्मचाऱ्यांची एकाचदिवशी सुनावणी होणार आहे. यावेळी म्हणणे मांडण्याचे आदेश चौकशी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. माजी संचालकांमध्ये माजी मंत्री मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, महापालिकेचे नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेविका बेबीताई पाटील, माजी नगरसेवक किरण जगदाळे, कुंदन बापूसाहेब पाटील, मुजीर जांभळीकर आदी ३४ जणांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)