घोटाळाप्रकरणी आज सुनावणी
By Admin | Updated: November 30, 2015 01:16 IST2015-11-29T23:54:34+5:302015-11-30T01:16:50+5:30
जिल्हा बॅँक : संचालकांना म्हणणे मांडण्याची संधी

घोटाळाप्रकरणी आज सुनावणी
सांगली : जिल्हा बॅँकेतील ४ कोटी १८ लाखांच्या घोटाळाप्रकरणी सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी चौकशी अधिकारी श्रीधर कोल्हापुरे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. याप्रकरणी गत सुनावणीवेळी १३ माजी संचालक व अधिकाऱ्यांनी म्हणणे सादर केले होते. १२ जणांनी म्हणणे सादर करण्यास मुदतवाढ मागितली होती.
घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी झालेल्या पहिल्या सुनावणीवेळी १४ जणांनी म्हणणे सादर केले होते. ३० जणांनी मुदतवाढीची मागणी केली. नोव्हेंबरपासून आरोपांबाबतच्या युक्तिवादाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा बँकेचे २००१-०२ ते २०११-१२ या कालावधितील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या.
जिल्हा विशेष लेखापरीक्षक कोल्हापुरे यांनी ४ कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची जबाबदारी संचालक व कार्यकारी संचालकांवर निश्चितीसाठी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी ४४ माजी संचालक व तीन तत्कालीन कार्यकारी संचालकांना नोटीस दिली होती. त्यानंतर मृत चार संचालकांच्या १६ वारसदारांनाही सुनावणीसाठी नोटिसा बजाविल्या. (प्रतिनिधी)
संचालकांवर आरोप निश्चित
गेले चार महिने सुनावणीचे काम सुरू होते. यात संचालक, अधिकाऱ्यांनी आपले म्हणणे सादर केले आहे. त्यानंतर कोल्हापुरे यांनी बँकेचे संचालक, अधिकारी व मृत संचालकांचे वारसदार अशा एकूण ७० जणांवर आरोप निश्चित केले आहेत. बँकेच्या नुकसानीला संबंधितांना जबाबदार धरून वसुली का करण्यात येऊ नये, अशी नोटीस त्यांनी बजाविली होती.