महेश जाधवच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:10+5:302021-08-25T04:32:10+5:30
ॲपेक्स रुग्णालयात ८७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव, डॉ. मदन जाधव यांच्यासह ...

महेश जाधवच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी
ॲपेक्स रुग्णालयात ८७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली रुग्णालयाचा संचालक डॉ. महेश जाधव, डॉ. मदन जाधव यांच्यासह १५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, ॲपेक्स प्रकरणातील काही आरोपी फरारी असल्याने अटकेतील आरोपींना जामीन न देण्याची मागणी गांधी चौक पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे. मंगळवारी सुनावणी दरम्यान डॉ. महेश जाधव याच्या वकीलांनी बाजू मांडली. यानंतर पोलिसांना म्हणणे सादर करण्यासाठी मुदत देत सुनावणी दोन दिवस पुढे ढकलण्यात आली.
आता पोलिसांची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाने गुरुवार २६ ऑगस्टची तारीख दिली आहे. यावेळी महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी आपली बाजू मांडतील. पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या लेखी तक्रारी, हस्तगत केलेली कागदपत्रे, काही जणांच्या साक्षी, पत्रव्यवहार आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे जबाब न्यायालयात सादर करण्यात येतील. बचाव पक्ष आणि पोलीस अशा दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अंतिम सुनावणी पार पडेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, ॲपेक्सप्रकरणी डॉक्टरांच्या जामीन अर्जावर होणाऱ्या न्यायालयाच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.