आरोग्य सेविकेच्या परीक्षेचा पेपर फुटला
By Admin | Updated: November 26, 2015 00:23 IST2015-11-26T00:23:09+5:302015-11-26T00:23:09+5:30
जिल्हा परिषद : दोन आरोग्य सेविकांवर गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश; प्रशासनात खळबळ

आरोग्य सेविकेच्या परीक्षेचा पेपर फुटला
सांगली : जिल्हा परिषदेतील रिक्त असलेल्या पदांसाठी घेण्यात येत असलेल्या आरोग्य सेवक (महिला) या पदासाठीच्या लेखी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार बुधवारी दुपारी परीक्षेदरम्यान उघडकीस आला़ याप्रकरणी शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) आणि तिला मदत करणाऱ्या एका आरोग्य सेविकेवर जिल्हा परिषद प्रशासनाने सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
या धक्कादायक प्रकारामुळे जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी प्रशासनात एकच खळबळ उडाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतरच पेपर फुटीचा सूत्रधार बाहेर येण्याची शक्यता आहे. पेपर फुटीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या परीक्षेचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडील रिक्त पदांसाठी बुधवारपासून लेखी परीक्षा सुरु झाली आहे. पहिल्या दिवशी औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी परीक्षा होती़ आरोग्य सेवक (महिला) पदाच्या ३८ जागांसाठी ९१५ उमेदवार होते़ दुपारी दोन वाजता आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी लेखी परीक्षा होती़ ग़ रा़ पुरोहित कन्या प्रशालेतील वर्ग क्रमांक आठ येथे पर्यवेक्षक कांतिनाथ जोशी यांनी प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उमेदवारांना उत्तरपत्रिका दिली़ या वर्गातील शाहीन अजमुद्दीन जमादार (रा. करगणी, ता़ आटपाडी) या उमेदवाराने प्रश्नपत्रिका हातात पडण्यापूर्वीच उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ वर्गातील शेजारच्या उमेदवारांना त्याबाबत शंका आली़ प्रश्नपत्रिकेपूर्वीच उत्तरपत्रिका लिहिली जात असल्याबाबत पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आणून दिले़ काही वेळाने वर्गातील सर्व उमेदवारांना प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यानंतर सर्व उमेदवारांनी उत्तरे लिहिण्यास सुरुवात केली़ पर्यवेक्षकाने जाब विचारल्यानंतर शाहीनने बाथरुमला जाण्याचा बहाणा केला़ बाथरुमला गेल्यानंतर ती पायजमा बदलून आली़ कपडे बदलल्यानंतरही तिच्या पायजम्यावर उत्तरे लिहिली असल्याचे निदर्शनास आले़ पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुखांनी शाहीनला उलटसुलट विचारण्यास सुरुवात केल्यानंतर तिची बोबडी वळली़ प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वीच शाहीनने अर्ध्याहून अधिक उत्तरे लिहिली होती़ याप्रकरणी जिल्हा परिषदेकडील कंत्राटी आरोग्य सेविकांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ दोघींवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे़ पेपर फुटीबद्दल निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले़ पेपर फुटल्याने परीक्षार्थींमध्ये खळबळ उडाली असून फेरपरीक्षा होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)
मदतनीस ताब्यात : शाहीनची बोबडी वळली
शाहीनला तात्काळ अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू केली़ शाहीन जमादार ही शेटफळे येथील उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे़ तिला मदत करणारी उमराणी ही आरोग्य सेविका म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाले़ प्रश्नपत्रिका देण्यापूर्वी उत्तरे लिहिली जात असल्याने पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली़. शाहीन व उमराणी या दोघी जि. प.कडे कार्यरत असल्याने दोघींवर निलंबनाची कारवाई होणार आहे़
दोन्ही झेडपीच्या कर्मचारी
पेपर फुटल्याच्या प्रकरणात सापडलेली शाहीन जमादार ही शेटफळे आरोग्य उपकेंद्रात कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे, तर तिला मदत करणारी उमराणी ही नियमित आरोग्यसेविका आहे़ चौकशीत दोघीही जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असल्याचे स्पष्ट झाले़