खातेप्रमुखांनी स्वीय निधी वेळेत खर्च करावा
By Admin | Updated: June 3, 2015 01:05 IST2015-06-02T23:56:03+5:302015-06-03T01:05:37+5:30
उपाध्यक्षांचा इशारा : शाळांना सौर अभ्यासिका वाटपाचा निर्णय

खातेप्रमुखांनी स्वीय निधी वेळेत खर्च करावा
सांगली : जिल्हा परिषद स्वीय निधीतून दिलेला निधी खातेप्रमुखांनी वेळेत खर्च करून लाभार्थींना लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. खातेप्रमुखांकडून वेळेवर निधी खर्च झाला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी अर्थ समिती सभेत दिला. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील संगणक वेळेवर चालण्यासाठी सौर अभ्यासिका देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शाळांची गरज ओळखून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद स्वीय निधी उपलब्ध असतानाही खातेप्रमुखांकडून वेळेवर तो खर्च होत नाही. याबद्दल त्यांना वारंवार सूचना देऊनही मार्च एन्डलाच खर्च करण्याकडे त्यांचा कल असतो. घाईगडबडीने साहित्य खरेदी करून ते दर्जेदार मिळत नाही. चौकशी करण्यासाठी अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्यामुळे लाभार्थींना निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जात आहे. लाभार्थींना दर्जेदार साहित्याचा पुरवठा करण्यासाठी म्हणून खातेप्रमुखांनी वेळेवर निधी खर्च करावा, अन्यथा त्यांच्यावरच कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेत संगणक असूनही तेथे वीज नसल्यामुळे ते बंद आहेत. म्हणून तेथे सौर अभ्यासिका बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सुरेश मोहिते, तानाजी यमगर यांच्यासह सदस्य, मुख्य वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे व खातेप्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सुधारित खर्चाला मंजुरी
जिल्ह्यातील बारा गावांतील पाणी पुरवठा योजनांमध्ये पाण्याची टाकीच तयार केलेली नाही. येथील कामामध्ये गैरव्यवहार नसतील, तर सुधारित खर्चाला मंजुरी देण्यात येईल, असे अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी सांगितले.