‘मागेल त्याला शेततळे’ ठरले मृगजळ

By Admin | Updated: June 16, 2016 01:09 IST2016-06-15T23:25:12+5:302016-06-16T01:09:46+5:30

जत तालुक्यातील अवस्था : जाचक अटींमुळे लाभार्थी वंचित

He will be 'farmed' by the marijuana | ‘मागेल त्याला शेततळे’ ठरले मृगजळ

‘मागेल त्याला शेततळे’ ठरले मृगजळ

गजानन पाटील --संख -शासनाच्या जाचक अटी, कमी रक्कम यामुळे कृषी विभागाची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे. फळबागांसाठी उपयुक्त असलेल्या आर. के. व्ही. वाय. व एन. एच. एम. या योजना शासनाने बंद केल्या आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ या गोंडस नावाखाली योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करण्यात आले आहे. हेच का शेतकऱ्यांसाठी ‘अच्छे दिन?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
कृषी विभागाकडून मोठा गाजावाजा करून ही योजना फेबु्रवारी महिन्यामध्ये आणण्यात आली. प्रसारमाध्यमांना जाहिरात देऊन शेतकऱ्यांना शासनाच्या बेवसाईटवर आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. कागदोपत्री, आॅनलाईन अर्ज भरणे यासाठी शेतकऱ्यांनी १५० रुपये खर्च केले आहेत. जत तालुक्यातून या योजनेसाठी ८ हजार आॅनलाईन आले होते. त्यामधून फक्त २७६ शेततळी मंजूरची यादी आली आहे. त्यामुळे २७६ लाभार्थींना लाभ मिळणार आहे. कमी रक्कम, जाचक अटींमुळे कितपत लाभ मिळेल, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ योजना दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना वरदायी ठरणार आहे. या तलावाच्या माध्यमातून पाण्याची साठवणूक व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी उपयोग होणार आहे. ८ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत.
या योजनेसाठी पात्रता ज्या शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन उपलब्ध आहे, यापूर्वी इतर योजनांच्या माध्यमातून शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा बोडी या घटकाचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी शेतकऱ्याची जमीन शेततळ्याकरिता तांत्रिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक. मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झालेल्या गावांमधील लाभार्थी या योजनेसाठी पात्र राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राधान्यक्रमासाठी दारिद्र्य रेषेखालील (बीपीएल) शेतकरी व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली आहे, अशा शेतकऱ्यांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्येष्ठता यादीनुसार ( प्रथम अर्ज सादर करणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे) या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल, अशी नियमावली होती.
या योजनेसाठी तालुक्यातून आॅनलाईन पद्धतीने ८ हजार अर्ज केलेले होते. त्यामधून २७६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या शेततळ्यांना मंजुरी आली आहे. पण कमी रक्कम, बिल काढण्याच्या जाचक अटी यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळणार का?, हा प्रश्न निर्माण नागरिकांतु होत आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेमध्ये शेततळे जमिनीची खुदाई करून जमिनीमध्ये करायचे आहे. कठीण खडक असल्यामुळे हे काम ५० हजार रुपयांमध्ये पूर्ण होणे शक्य नाही. फक्त मऊ माती व मळ्याच्या शेतामध्ये ५० हजारात हे काम होईल. बिल अदा करण्यासाठी जाचक आॅनलाईन अटी आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. शेततळे ३० बाय ३० बाय ३ चे करण्यासाठी दीड लाख रुपयांची गरज आहे. शेततलावासाठी शासनाची आर.के.व्ही.वाय. व एन.एच.एम. ही योजना होती. ती २००९ मध्ये बंद करण्यात आली आहे. त्यावेळी या योजनेसाठी ८८ हजार रुपये होते. ही योजना बंद करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना निसर्गाकडून व शासनाकडून हेळसांड सहन करावी लागत आहे.
सध्या द्राक्षे, डाळिंब, बोर, लिंबू या बागांचे क्षेत्र वाढले आहे. पाऊस कमी झाल्याने पाण्याची साठवणूक करून फळबागांना देणे सुलभ होणार आहे. यासाठी रक्कम वाढविणे व जाचक अटी शिथील करणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

Web Title: He will be 'farmed' by the marijuana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.