सांगलीत चाकूहल्ला करीत रोकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:16+5:302021-09-15T04:32:16+5:30
सांगली : शहरातील दसरा चौकात घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला करत ११ हजारांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात तिघांवर ...

सांगलीत चाकूहल्ला करीत रोकड लांबविली
सांगली : शहरातील दसरा चौकात घरात घुसून महिलेवर चाकूहल्ला करत ११ हजारांची रोकड लंपास करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात तिघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी शुमा उर्फ सुमन इन्साक शेख (वय २६) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी शुमा उर्फ सुमन शेख या आई राणी शेख यांच्यासह दसरा चौकात राहतात. त्या धुणीभांडीचे काम करतात. गावाकडे राहत असलेल्या वडिलांना शुमा या पैसे पाठवणार होत्या. त्यासाठी त्यांनी घरातील पत्र्याच्या पेटीत पैसे साठवून ठेवले होते. सोमवारी दुपारी शुमा घरी एकट्या होत्या. यावेळी तीन अज्ञात तरुण त्यांच्या घराकडे आले. त्यांनी येथे वडर गल्ली कोठे आहे, असे विचारले. शुमा यांनी बोट करून रस्ता दाखवला. यावेळी त्या पैसे मोजत होत्या. पैसे पेटीत ठेवण्यासाठी शुमा आत आल्यानंतर पत्ता विचारणाऱ्या अज्ञातांनी घरात घुसून शुमा यांच्या डोक्यात शस्त्राने वार केला आणि पैसे हिसकावून घेतले. शुमा यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी पुन्हा डोक्यात हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी शुमा यांच्याजवळील ११ हजाराची रोख रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.