हवालदारास लाच घेताना पकडले
By Admin | Updated: August 27, 2015 23:07 IST2015-08-27T23:07:29+5:302015-08-27T23:07:29+5:30
इस्लामपुरात कारवाई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा सापळा

हवालदारास लाच घेताना पकडले
इस्लामपूर : इस्लामपूर बसस्थानक परिसरातून मोटारसायकल चोरून नेत असल्याच्या संशयावरून पकडलेल्या व्यक्तीस सोडण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच त्यातील दोन हजार रुपये लाच घेताना एका पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले. गुरुवारी दुपारी सव्वाचार वाजता ही कारवाई झाली.लक्ष्मण अण्णा पवार (वय ५३, सध्या नेमणूक इस्लामपूर पोलीस ठाणे, मूळ रा. विद्यानगर गल्ली क्र. ३ वारणाली-सांगली) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, लहू अंकुश राजाराम नांगरे (४५, रा. भाटवडे, ता. वाळवा) यांचे डोंगरवाडी येथील मेहुणे कामानिमित्त स्वत:ची मोटारसायकल घेऊन इस्लामपूरला आले होते. बसस्थानक परिसरात त्यांनी त्यांची मोटारसायकल लावली. तेथेच शेजारी आणखी एक मोटारसायकल लागली होती. काही वेळाने नांगरे यांचे मेहुणे आपल्या मोटारसायकलऐवजी शेजारच्या मोटारसायकलवर बसले होते. त्यामुळे ते मोटारसायकल चोरुन नेत असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी सायंकाळी त्यांना ताब्यात घेतले.या घटनेची माहिती मिळताच नांगरे हे पोलीस ठाण्यात आले. या घटनेचा तपास करणारे हवालदार लक्ष्मण पवार यांना भेटले. त्यावेळी पवार यांनी नांगरे यांच्या मेहुण्याला सोडण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावर नांगरे यांनी गुरुवारी सकाळी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात रितसर तक्रार दिली. या तक्रारीची लाचलुचपत कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये पवार याने तीन हजारांची लाच मागून चर्चेअंती दोन हजार रुपयांची लाच तातडीने आणून देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हवालदार पवार याच्याविरुध्द सापळा लावण्यात आला. नांगरे यांच्या मेहुण्यावर कलम १०९ खाली प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्याला तहसीलदारांसमोर हजर करण्यासाठी घेऊन जाताना दुपारी सव्वाचारच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारातच दोन हजार रुपयांची लाच घेताना हवालदार पवार ‘लाचलुचपत’च्या सापळ्यात अलगदपणे विसावला.
पोलीस उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एच. ए. जाधव, कर्मचारी प्रकाश पवार, सुनील राऊत, सुनील कदम, दीपक धुमाळे, चंद्रकांत गायकवाड, सचिन कुंभार, बाळासाहेब पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (वार्ताहर)
‘लाचलुचपत’ची २४ वी कामगिरी..!
सांगलीच्या लाचलुचपत विभागाची आठ महिन्यांतील ही सुफरफास्ट अशी २४ वी कारवाई ठरली. सकाळी तक्रार दाखल झाल्यापासून अवघ्या ६ ते ७ तासात लाचखोर हवालदारास जेरबंद करण्यात आले. पोलिसांवरील ही सहावी, तर इस्लामपुरातील दुसरी कारवाई ठरली.
पवारही सुपरफास्टच..!
लाचलुचपतच्या सुपरफास्ट कारवाईत गारद झालेले हवालदार लक्ष्मण पवार हे सुध्दा सुपरफास्टच होते. एखाद्या कसलेल्या कायदेपंडिताप्रमाणे त्यांच्या बोलण्याचा तोरा असायचा. या तोऱ्यातील बोलण्यातून ते समोरच्याला गलितगात्र करून टाकायचे आणि त्यातून मग ‘पट मंगनी—झट कंडका’ अशा पध्दतीने खाबूगिरी करायचे. त्यांची ही खाबूगिरीची सवयच त्यांना कारागृहाच्या उंबरठ्यावर तेवढ्याच वेगाने घेऊन गेली.