बेळंकीच्या विकासनगर शाळेची ‘आयएसओ’ मानांकनात ‘हॅट्ट्रिक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 23:59 IST2015-12-31T23:33:05+5:302015-12-31T23:59:42+5:30
जिल्हा परिषदेची शाळा : विविध शैक्षणिक उपक्रमांची घेतली दखल

बेळंकीच्या विकासनगर शाळेची ‘आयएसओ’ मानांकनात ‘हॅट्ट्रिक’
मिरज : विविध शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या बेळंकीतील विकासनगर जिल्हा परिषद शाळेने सलग तिसऱ्यावर्षी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले आहे. आज आॅस्ट्रियाच्या कंपनीचे प्रतिनिधी राजीव जम्मीहाल यांनी शाळेच्या उपक्रमांची पाहणी करून मानांकन जाहीर केले.
विकासनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सलग तीन वर्षे आयएसओ मानांकन मिळवून जिल्हा परिषद शाळांना सन्मान मिळवून दिला आहे. टीयुव्ही आॅस्ट्रिया कंपनीचे प्रतिनिधी राजीव जम्मीहाल यांनी शाळेने यावर्षी राबविलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची गुरुवारी तपासणी केली. मुलांनी तयार केलेल्या वस्तू, गोष्टी, कथा, कृती, मुलांच्या वह्यांतील निटनेटकेपणा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. ज्ञानरचनावाद या पद्धतीने करण्यात येणाऱ्या अध्यापनाची त्यांनी प्रशंसा केली. शाळेने गुणवत्तेबाबत भरारी घेऊन आदर्श शाळा म्हणून नावलौकिक सिद्ध केल्याचे जम्मीहाल यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी लेझीम, पिरॅमिड अॅरोबिक्सची प्रात्यक्षिके सादर केली. तीन शिक्षक असलेली व आयएसओ मानांकन मिळविणारी राज्यातील ही एकमेव जिल्हा परिषद शाळा आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, शिक्षक चंद्रकांत साळुंखे, प्रीया पाटील, शाळेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष अमृत कोरे, उदय पाटील, सहदेव हट्टे यांच्यासह पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
छाननीनंतर प्रमाणपत्र
शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची छाननी पार पडल्यानंतर जम्मीहाल यांनी तिसऱ्या वर्षीही शाळा आयएसओ मानांकनासाठी पात्र ठरल्याचे जाहीर केले.