हातनूरमध्ये मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST2021-03-17T04:27:40+5:302021-03-17T04:27:40+5:30

हातनूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील हे दीर्घकाळासाठी वैद्यकीय रजेवर आहेत. दरम्यान, मार्च एन्डमुळे शाळेची अंतर्गत कामे खोळंबू ...

In Hatnur, the headmaster tore down the register of the school management committee | हातनूरमध्ये मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले

हातनूरमध्ये मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले

हातनूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील हे दीर्घकाळासाठी वैद्यकीय रजेवर आहेत. दरम्यान, मार्च एन्डमुळे शाळेची अंतर्गत कामे खोळंबू नयेत, यासाठी वरिष्ठ शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी देण्यात येणार होती. रजेवर असणाऱ्या सुरेश पाटील यांच्यानंतर शाळेत ६ ते ७ शिक्षक वरिष्ठ आहेत. मात्र यातील अनेकांनी पदभार स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यामुळे शशिकांत पाटील यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी देण्यात आली.

मात्र ही निवड चुकीच्या पद्धतीने झाल्याचा ग्रामस्थ व पालकांचा आरोप आहे. त्यांच्याबाबतीत अनेक तक्रारी आहेत. त्यांच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाली होती, अशी ग्रामस्थ व पालकांची तक्रार आहे. शिवाय ग्रामस्थ व पालकांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने त्यांची निवड करण्यात आली आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी शिक्षण विभागाने मंगळवारी विस्तार अधिकारी शामल माळी यांना हातनूरला पाठवले होते. यासाठी शाळेत तक्रारदार ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना बोलवण्यात आले होते. दरम्यान, ग्रामस्थ व पालकांनी प्रभारी मुख्याध्यापक पाटील यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा माळी यांच्यासमोर वाचला. यामुळे वातावरण तापत गेले. शाळा व्यवस्थापन समितीचे चुकीचे ठराव घेऊन ही निवड झाल्याचा आरोपही यावेळी झाला. त्यामुळे वातावरण आणखीच गरम झाले.

ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या तक्रारींच्या फैरीमुळे संतापलेल्या प्रभारी मुख्याध्यापक पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर चक्क विस्तार अधिकाऱ्यांसमोर फाडले. या प्रकारामुळे शाळेत तणाव निर्माण झाला. दरम्यान, विस्तार अधिकाऱ्यांसमोरच रजिस्टर फाडल्याची तक्रार पवार यांनी माळी यांच्याकडे केली. ही तक्रार स्वीकारत माळी यांनी त्यावर पोहोच दिली आहे. याचा अर्थ माळी यांनी मुख्याध्यापक पाटील यांनी रजिस्टर फाडल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. याप्रकरणी पाटील यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा पवार यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.

चाैकट

शहानिशा करून कारवाई : गटशिक्षणाधिकारी

घटनेबाबत गटशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे म्हणाल्या, प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व पालकांची तक्रार आहे. या तक्रारीबाबत शहानिशा करण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी शामल माळी यांना हातनूरला पाठवले होते. यावेळी पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याबाबत शिक्षण विस्तार अधिकारी माळी यांचा अहवाल आल्यानंतर शहानिशा करून दोषींवर कारवाई केली जाईल.

Web Title: In Hatnur, the headmaster tore down the register of the school management committee