हातनूरमध्ये मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:52+5:302021-03-17T04:26:52+5:30
तासगाव तालुक्यातील हातनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले, असा आरोप ...

हातनूरमध्ये मुख्याध्यापकाने शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले
तासगाव तालुक्यातील हातनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शिक्षण विस्तार अधिकारी शामल माळी यांच्यासह सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकासमोर हा प्रकार घडला, असेही पवार यांच्यासह ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
हातनूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील दीर्घकाळासाठी वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे हे पद रिक्त होते. दरम्यान, मार्चअखेर असल्याने शाळेची अंतर्गत कामे खोळंबू नयेत, यासाठी वरिष्ठ शिक्षकाला प्रभारी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी देण्यात येणार होती. सुरेश पाटील यांच्यानंतर शाळेत सहा शिक्षक वरिष्ठ आहेत. मात्र, यातील अनेकांनी पदभार स्वीकारण्यास नकार दर्शवला. त्यामुळे शशिकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी शिक्षण विभागाने सोपवली.
मात्र पाटील पदास लायक नाहीत, त्यांचे वर्तन, वागणूक चांगली नाही, ते चारित्र्यहीन आहेत, त्यांच्याबाबतीत अनेक तक्रारी आहेत, त्यांच्यावर यापूर्वी निलंबनाची कारवाई झाली होती, अशी ग्रामस्थ व पालकांची तक्रार आहे. विश्वासात न घेता निवड करण्यात आली आहे, अशी तक्रारही शिक्षण विभागाकडे केली आहे.
या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी मंगळवारी विस्तार अधिकारी शामल माळी हातनूरला गेल्या होत्या. शाळेत तक्रारदार ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना बोलवण्यात आले होते. दरम्यान, ग्रामस्थ व पालकांनी पाटील यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा माळी यांच्यासमोर वाचला. यामुळे वातावरण तापत गेले. शाळा व्यवस्थापन समितीचे चुकीचे ठराव घेऊन ही निवड झाल्याचा आरोपही यावेळी झाला. त्यामुळे वातावरण गरम झाले.
तक्रारींच्या फैरीमुळे संतापलेल्या प्रभारी मुख्याध्यापक पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर चक्क विस्तार अधिकाऱ्यांसमोर फाडले. या प्रकारामुळे शाळेत तणाव निर्माण झाला.
विस्तार अधिकाऱ्यांसमोरच रजिस्टर फाडल्याची तक्रार सूर्यकांत पवार यांनी माळी यांच्याकडे केली. ही तक्रार स्वीकारत माळी यांनी त्यावर पोहोच दिली आहे. याचा अर्थ माळी यांनी मुख्याध्यापक पाटील यांनी रजिस्टर फाडल्याची अप्रत्यक्षपणे कबुली दिली आहे. याप्रकरणी कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
चौकट
अहवालानंतर शहानिशा करून कारवाई करू : गटशिक्षणाधिकारी
याबाबत गटशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे म्हणाल्या, शशिकांत पाटील यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व पालकांची तक्रार आहे. याबाबत शहानिशा करण्यासाठी माळी यांना हातनूरला पाठवले होते. यावेळी पाटील यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे रजिस्टर फाडल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. याबाबत माळी यांचा अहवाल आल्यानंतर शहानिशा करून दोषींवर पुढील कारवाई केली जाईल.