कांदेतील वीणा पहारा कोरोनामुळे खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:18 IST2021-06-20T04:18:55+5:302021-06-20T04:18:55+5:30
फोटो-१९शिराळा१ फोटो ओळ : कांदे (ता. शिराळा) येथील हनुमान मंदिरात सुरु असणारी वीणा पहाऱ्याची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे. ...

कांदेतील वीणा पहारा कोरोनामुळे खंडित
फोटो-१९शिराळा१
फोटो ओळ : कांदे (ता. शिराळा) येथील हनुमान मंदिरात सुरु असणारी वीणा पहाऱ्याची परंपरा कोरोनामुळे खंडित झाली आहे.
विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : अखंड वीणा पहारा करणारे गाव म्हणून कांदे (ता. शिराळा) या गावच्या सांस्कृतिक व भक्ती परंपरेची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे. गावाच्या मुख्य चौकातील हनुमान मंदिरात मागील सव्वाशे वर्षांपासून सुरू असलेली अखंड वीणा पहारा परंपरा गावाने जोपासली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे अखंड असणारी वीणा पहारा परंपरा खंडित झाली आहे.
गावाच्या मध्यभागी हनुमान मंदिरात शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ कोणतीही एक व्यक्ती ही वीणा पहाऱ्यासाठी वीणा गळ्यात घेऊन उभी असते. हे चित्र इथल्या प्रत्येकासाठी नित्याचेच. कोरोनाच्या काळापर्यंत खाली न ठेवता या वीणेचा हा पहारा सव्वाशे वर्ष अखंड होता. आता मात्र कोरोनाच्या संकटाने हा वीणेचा सूर थांबला आहे.
महाराष्ट्रातील काही मोजक्याच गावात ही परंपरा होती ती ही मोडीत निघाली आहे. कोरोनाच्या काळात जिथे देऊळच बंद झाले तिथेच हा वीणा वादनाचा अखंड सूरही बंद झाला. एक समृद्ध ऐतिहासिक परंपरा खंडित झाली. सव्वाशे वर्षांत अनेक घटनांचा साक्षीदार असणारा मंदिरातील वीणा वादन पहारा आता मात्र एक इतिहास झाला आहे, हे मात्र नक्की.
चाैकट
पहाऱ्याला भक्तीची जोड
खरंतर असे म्हटले जाते की, पूर्वीच्या काळी गावात प्रवेशासाठी एकच प्रवेशद्वार होते. त्याकाळी दरोडेखोर, चोरटे यांच्यापासून गावाचे संरक्षण व्हावे, या हेतूने जागत्या पहाऱ्याला भक्तीची जोड देऊन वीणा पहाऱ्याला सुरुवात झाली.