कर्मनिष्ठ उद्योजक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:38+5:302021-06-20T04:19:38+5:30

रामप्रताप झंवर यांचा जन्म १९३५ मध्ये झाला. त्यांना दोन भाऊ व एक बहीण आहेत. त्यांची घरची परिस्थिती सामान्य होती. ...

Hardworking entrepreneur | कर्मनिष्ठ उद्योजक

कर्मनिष्ठ उद्योजक

रामप्रताप झंवर यांचा जन्म १९३५ मध्ये झाला. त्यांना दोन भाऊ व एक बहीण आहेत. त्यांची घरची परिस्थिती सामान्य होती. त्यांचे बालपण येथील श्रीराम मंदिर परिसरातच गेले. झंवर यांचे सातवीपर्यंत शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात प्रवेश घेतला. या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेने शाळेच्या खोल्या श्रमदानाने त्यांनी बांधल्या. शाळेत असताना गणित विषय त्यांच्या आवडीचा होता. त्यामुळे त्यांचा पहिला किंवा दुसरा क्रमांक येत असे तेव्हापासून आपण अभियंता व्हायचे असे त्यांनी मनात ठरवले.

अकरावीच्या परीक्षेत गणितात ३०० पैकी ३०० गुण मिळाले. त्यामुळे वडिलांनी त्यांना पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पाठवले. अकरावीमध्ये सातारा सेंटरमध्ये त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. सुमारे बारा बारा तास अभ्यास करून जिद्द आणि कष्टाच्या जोरावर यश खेचून आणले. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई मेकॅनिकल परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये निवड झाली. १५० रुपये पगारावर नोकरीला सुरुवात झाली. २९ जून १९६५ रोजी त्यांचा विवाह झाला.

सुमारे साडेसहा वर्षाचा काळ त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला. ते प्रोडक्शन इंजिनिअर म्हणून काम करत होते. दिवसभर नेमलेले काम करून रात्री पुन्हा अनुभवासाठी कारखान्यात जात असत. त्यातून कामाचे सारे बारकावे आणि खाचाखोचा त्यांना अवगत झाल्या. शिवाय दरवर्षी दुप्पट प्रमोशन मिळत गेले. कंपनीच्या सुवर्णयुगात झंवर यांनी काम केले. त्यांच्यातील उद्योजक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. नोकरीत मन रमत नव्हते. अखेर त्यांनी राजीनामा दिला व स्वतःच्या उद्योगाचे स्वप्न साकार करण्यासाठी कोल्हापूर गाठले. कोल्हापूरमधील उद्यम नगर येथे पंडितराव कुलकर्णी यांच्या मदतीने १९६६ मध्ये १० बाय १० च्या खोलीत 'इंजिनियरिंग डेव्हलपमेंट 'कंपनी सुरू केली. चांगला दर्जा व तत्पर सेवेमुळे इंजिनिअरिंग डेव्हलपमेंटच्या उत्पादनांची मागणी वाढली. एका लेथवर सुरू केलेल्या कामाला चांगले काम मिळू लागले आणि 'ईडीपद्मा' या ब्रँडचे पार्ट्स देशात पोहोचले. झंवर यांनी पंडितराव कुलकर्णी व साखरपे यांच्याशी भागीदारीत व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. आपले उद्योगाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी झंवर यांनी १९८२ मध्ये स्वतःचा स्वतंत्र असा मे आर एस झेड इंडस्ट्रीज हा वर्कशॉप सुरू केला.

झंवर यांनी आयुष्याच्या ५० व्या वर्षी उद्योग जगतातील आपली 'सेकंड इनिंग' सुरू केली. 'ॲक्युरेट इंजिनिरिंग' च्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात पदार्पण केले. काही वर्षातच या उद्योगाचा विस्तार केला. त्यानंतर आर एस झेड ही कंपनी शिरोली एमआयडीसी येथे उभारली. १९८५ मध्ये त्यांनी व्यवसाय विस्ताराचे धोरण अवलंबून मे श्रीराम फाऊंड्रीची स्थापना केली. फाऊंड्रीमध्ये टाटा, महिंद्रा, एस्कार्ट कंपन्यांसह अमेरिका, युरोप व इतर देशात कास्टिंगसह फिनिशिंग कास्टिंगची ही निर्यात करण्यात येत आहे. या ठिकाणी सुमारे १० हजार टन कास्टिंग तयार होत आहे. ४ फाउंड्री' १२ मशीन शॉप व ३ हजार कामगार असलेल्या या उद्योग समूहाची उलाढाल सुमारे पाचशे कोटींची आहे.

श्रीराम फाऊंड्रीनंतर आष्टा लाइनर्स, एस. जे. आयर्न, कस्तुरी व श्रीराम फाऊंड्री पंतनगर उत्तरांचल, मे झंवर इंजिनिअरिंग एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, मे आर एस झेड इंडस्ट्रीज या उद्योगाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.

झंवर यांनी आष्टा येथे सुरू केलेल्या आष्टा लाइनर्स व कस्तुरी फाऊंड्री या ठिकाणी आष्टा व परिसरातील हजारो युवकांना काम मिळाले आहे. आष्टा परिसरातील एकमेव उद्योग असल्याने या उद्योगाची भरभराट झाली आहे. झंवर यांची आष्टा येथील श्रीरामावर अतिशय श्रद्धा होती. प्रतिवर्षी श्रीराम नवमी व गोकुळाष्टमी यावेळी ते आवर्जून उपस्थित राहत असत. २००३ मध्ये श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या ठिकाणी रामनवमी व गोकुळाष्टमी या वेळी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येते. रामनवमीच्या महाप्रसादावेळी आष्टा व परिसरातील हजारो भाविक उपस्थित असतात. रामप्रताप झंवर यांनी आष्टा येथील राममंदिरानजीक असलेल्या डायग्नोस्टिक सेंटरसाठी कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत रामप्रताप झंवर डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन केले होते. तसेच राम मंदिर जवळ मार्गाला झंवर यांचे नाव देण्यात आले आहे. आष्टा येथील नागरिकांसाठी त्यांच्या हृदयात नेहमीच आपुलकीची भावना होती. त्यामुळे त्यांनी आष्टा लाइनर्स व कस्तुरी फाउंड्री हे उद्योग सुरू ठेवले व हजारो युवकांना रोजगार दिला शहरातील विविध कामासाठी त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.

Web Title: Hardworking entrepreneur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.