माणुसकीच्या भिंतीला हजारो हातांची मदत...

By Admin | Updated: November 17, 2016 23:29 IST2016-11-17T23:29:02+5:302016-11-17T23:29:02+5:30

जुन्या द्या, हवे ते न्या : विश्रामबाग येथील हनुमान मंडळाचा अनोखा उपक्रम; नागरिकांकडून मिळतोय प्रतिसाद

Hands of thousands of hands helping humanity ... | माणुसकीच्या भिंतीला हजारो हातांची मदत...

माणुसकीच्या भिंतीला हजारो हातांची मदत...

सांगली : जुने वापरात नसलेले कपडे, चपला, शैक्षणिक साहित्य, अशा एक ना अनेक वस्तू आपण कुठेही कचऱ्यात फेकून देत असतो. पण या वस्तू गोरगरीब, गरजूंना उपयोगात येऊ शकतात. याचाच विचार करून विश्रामबाग येथील हनुमान मंडळाने अशा वस्तू जमा करीत माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे. गुरुवारी मंडळाकडे कपडे, चप्पल, चष्मा फ्रेम, शैक्षणिक साहित्य अशा वस्तू जमा झाल्या. ज्यांना अंगभर घालायला कपडे नाहीत, शिकायला वह्या, कंपॉस नाही, त्यांना या वस्तूंचे मोफत वाटप मंडळाने केले.
विश्रामबाग येथील सावरकर शाळेनजीक असणाऱ्या वीर हनुमान मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते झाली. २७ नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम सुरु राहणार आहे. हनुमान मंदिराजवळ एका मंडपात माणुसकीची भिंत उभी केली आहे. या उपक्रमात सहभागी झालेले कार्यकर्ते, साहित्य देणारे हजारो हात आणि ज्यांना गरज आहे असे असंख्य गरजू जमले होते.
‘नको असेल ते द्या... हवे असेल ते घेऊन जा...’ असा अनोखा उपक्रम राबवून मंडळाचे कार्यकर्ते जुने कपडे देणाऱ्यांचा, एक झाडाचे रोप देऊन सन्मानही करतात. गुरुवारी दिवसभरात वापरात असलेले सुस्थितीतील शर्ट, पँट, जॅकेट, ब्लँकेट, स्वेटर, सलवार कमीज, साड्या, लहान मुलांचे कपडे अनेकांनी दान केले. समाजातील माणुसकी कशी सजग असू शकते, याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम आहे.
मंडळाचे कार्यकर्ते पांडुरंग गरुड, अमित कांबळे, गणेश साळुंखे, सचिन कदम, विशाल ग्राफीक्स, दीपक पाटील, सचिन टोपकर, कुणाल कासोटी, राजू कदम, अमित बेडकाळे, अमित सर्वदे, राघवेंद्र इलेजार, चेतन पाटील, महेश कर्णी अशा कार्यकर्त्यांचे हजारो हात या सामाजिक उपक्रमासाठी राबत आहेत. (प्रतिनिधी)
देवही साथीला!
हनुमान मंडळाच्या या उपक्रमात जुने कपडे देऊन हजारो हात सहभागी झाले आहेत. कुणी कपडे दिले, कुणी शैक्षणिक साहित्य दिले, कुणी जुन्या चपला दिल्या. एका नागरिकाने तर देवांच्या प्रतिमाही दिल्या आहेत. ज्यांना देवांच्या प्रतिमाही विकत घेता येऊ शकत नाहीत, अशा गरजूंना देवांचीही साथ मिळेल, या उद्दात हेतूने त्याने हे दान दिले आहे.
सांगलीकरांना सहभागाचे आवाहन...
हनुमान मंडळाच्या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर तासगाव तालुक्यातील निमणी येथील गरीब शेतकरी सकाळी अकरा वाजताच कार्यक्रमस्थळी आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी गरजेनुसार जुने कपडे घेतले. जाताना कार्यकर्त्यांना धन्यवादही दिले. सांगलीवाडीतील अजय अर्जुन हे बीएसएनएलमध्ये नोकरीस आहेत. त्यांनीही घरातील जुने कपडे इस्त्री करुन या उपक्रमासाठी दिले. अशी अनेक मंडळी मदतीचा हात देऊ लागली आहेत. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात सांगलीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाने केले आहे.

Web Title: Hands of thousands of hands helping humanity ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.