अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य ‘डासां’च्या हाती
By Admin | Updated: November 14, 2014 23:23 IST2014-11-14T23:14:38+5:302014-11-14T23:23:43+5:30
गांधी वसतिगृहातील स्थिती : जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासनाचेही दुर्लक्ष

अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य ‘डासां’च्या हाती
नरेंद्र रानडे - सांगली -जिल्हा प्रशासनाने डेंग्यूचा फैलाव होऊ नये यासाठी व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. परंतु जिल्हा परिषदेपासून काही अंतरावरच असणाऱ्या महात्मा गांधी शासकीय वसतिगृहात प्रशासन राबवित असलेल्या अस्वच्छता अभियानामुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेली झुडुपे, सांडपाण्याच्या निचऱ्याचा अभाव, परिसरातच फेकण्यात येणारा कचरा यामुळे वसतिगृहात प्रचंड प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
जिल्हा परिषदेपासून जवळच असणाऱ्या शासकीय वसतिगृहातील अस्वच्छतेकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. महात्मा गांधी वसतिगृहात सध्या १४३ विद्यार्थी निवासी आहेत. तेथे सुरक्षारक्षक असून नसल्यासारखाच आहे. यामुळे रस्त्यावर फिरणारी डुकरे, मोकाट कुत्री यांचा वसतिगृहाच्या आवारात मुक्त संचार आहे. आरोग्य चांगले राहावे यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळावेत, यासाठी वसतिगृहाने क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. परंतु सध्या तेथे प्रचंड प्रमाणात झुडपे वाढलेली आहेत. त्यामध्येच परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी वारंवार समाजकल्याण विभागाकडे पाठपुरावा करुनही स्वच्छता करण्याची केवळ आश्वासने देण्यात येत आहेत.
डासांची उत्पत्ती होऊ न देण्यासाठी सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे. परंतु स्वच्छतागृहाच्या मागील बाजूस सांडपाणी साठले आहे. पाणी साठू नये यासाठी प्रशासनातर्फे अद्याप उपाययोजना नाहीत. डास निर्माण होऊ नयेत यासाठी साठलेल्या पाण्यावर रॉकेल टाकणे अत्यावश्यक आहे. सायंकाळनंतर परिसरात डासांचे साम्राज्य पसरत आहे. विद्यार्थ्यांचा वेळ अभ्यास करण्यापेक्षा डासांपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यात जात आहे. डेंग्यूच्या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने वसतिगृहातील परिसर स्वच्छ करावा, अशी विद्यार्थ्यांकडून मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांनीच राबविली स्वच्छता मोहीम
वसतिगृह परिसरात स्वच्छता करावी यासाठी विद्यार्थ्यांनी सतत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु तेथील अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने डेंग्यूच्या वाढत्या फैलावामुळे धास्तावलेल्या विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबविली आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील खोल्यांशेजारी वाढलेली झुडपे काढून टाकली आहेत.
वसतिगृह निरीक्षक गायब
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांची कार्यवाही करण्यासाठी प्रशासन निरीक्षकाची नेमणूक करते. परंतु या वसतिगृहात कोणी निरीक्षकच नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. साहजिकच कोणतीही समस्या उद्भवली, तर त्यांना थेट जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागातच धाव घ्यावी लागते. भविष्यकाळात वसतिगृहात कायमस्वरूपी निरीक्षकाची नेमणूक करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.