आयुक्तांच्या हाती खोरे,
By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T23:04:18+5:302016-06-15T00:03:13+5:30
सांगलीत स्वच्छता मोहीम : अधिकारी उतरले रस्त्यावर

आयुक्तांच्या हाती खोरे,
सांगली : महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर रवींद्र खेबूडकर यांनी श्रमदानातून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मंगळवारी वाल्मिकी आवास वसाहतीत खेबूडकर यांनी स्वत: खोरे, फावडे हाती घेत गटारीतील कचरा साफ केला. त्यांंच्यासोबतच उपायुक्तांपासून सर्वच खातेप्रमुखांनी डोक्यावर कचऱ्याच्या टोपल्या घेऊन स्वच्छतेला वाहून घेतल्याचे चित्र दिसत होते.
आयुक्त खेबूडकर यांनी वाल्मिकी घरकुल वसाहतीत स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्त खेबूडकर अधिकाऱ्यांसमवेत स्वत:च स्वच्छतेसाठी वसाहतीत उतरले. सकाळी सात-साडेसात वाजताच स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. या वसाहतीत लोकांनी अक्षरश: हागणदारी केली आहे. दोन इमारतीमध्ये घरातली कचरा टाकला होता. अनेक घरांचे पाईपला गळती होती. यामुळे घरातील सांडपाणी इमारतीवरून ओघळून खाली येत होते. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती.
आयुक्त खेबूडकर यांनी स्वत:च हातात खोरे घेऊन गटारी मोकळ्या केल्या. सर्व अधिकाऱ्यांनी इमारतीच्या मध्ये टाकलेला कचऱ्याचा ढीग उचलला. टोपलीतून कचरा उचलून अधिकाऱ्यांनी रांग करून गाडीत भरला. दुसऱ्या गटाने औषध फवारणी सुरु केली. पावडर मारण्यात आली. मागच्या बाजूला नाल्याशेजारीच महापालिकेचे शौचालय मोडकळीस आले आहे. त्या ठिकाणी लोक उघड्यावर अधिकाऱ्यांसमोरच शौचास जात होते. खेबूडकर यांनी स्वत: या भागातील कचरा उचलला. सुमारे दोन-अडीच तास श्रमदान केल्यानंतर आयुक्त खेबूडकर यांनी आरोग्य अधिकारी डॉ. आंबोळे यांना स्वच्छता निरीक्षक, मुकादम यांच्यासह थांबण्याचे आदेश दिले.
उपायुक्त सुनील पवार, सहाय्यक आयुक्त रमेश वाघमारे, नगरसचिव चंद्रकांत आडके, मुख्य लेखापरिक्षक संजय गोसावी, आर. पी. जाधव, नकुल जकाते, सतीश सावंत, परमेश्वर हलकुडे मोहिमेत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधींची पाठ
महापालिका क्षेत्रातील स्वच्छता मोहिमेत अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनीही सहभागी व्हावे, अशी अपेक्षा होती. पण या मोहिमेकडे नगरसेवकांनी पाठ फिरवली. माजी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर वगळता एकही नगरसेवक वाल्मिकी-आंबेडकर वसाहतीत उपस्थित नव्हता.