दगडफेकीतील जखमी तरुणाला मिळाला मदतीचा हात
By Admin | Updated: June 22, 2014 00:29 IST2014-06-22T00:25:17+5:302014-06-22T00:29:16+5:30
भगीरथ ग्रुपचा पुढाकार : दहा हजार रुपयांचा धनादेश प्रदान, हिंसक प्रवृत्तीला उत्तर देत सामाजिक जाणिवेचा नवा संदेश

दगडफेकीतील जखमी तरुणाला मिळाला मदतीचा हात
सांगली : हिंसक वृत्तीने एकीकडे उच्छाद मांडला असला, तरी दुसऱ्या बाजूला सामाजिक जाणिवा असलेली मनेही तितकीच सक्षमपणे उभी आहेत. दंगलखोराने फेकलेल्या दगडाने गंभीर जखमी झालेल्या आप्पासाहेब म्हारगुडे या तरुणाला तितक्याच वेगाने मदतीचा हात देणाऱ्या भगीरथ ग्रुपने या गोष्टीची प्रचिती शुक्रवारी दिली. या गु्रुपने या तरुणाला दहा हजार रुपयांची मदत केली.
फेसबुकवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह छायाचित्र टाकल्याच्या वृत्ताने बारा दिवसांपूर्वी सांगलीतील वातावरण बिघडले होते. या घटनेशी काडीमात्र संबंध नसलेल्या सांगलीच्या लक्ष्मीनगर येथील आप्पासाहेब चंद्रकांत म्हारगुडे (वय २३) या तरुणाला दंगलखोरांच्या हिंसक वृत्तीचा फटका बसला. एसटीवर फेकलेल्या एका दगडाने दुचाकीवरून चाललेल्या आप्पासाहेबचा वेध घेतला आणि तो गंभीर जखमी झाला. कवटीला जोराचा मार लागल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. दारिद्र्याशी संघर्ष करीत जगणाऱ्या म्हारगुडे कुटुंबियांवर या घटनेचा मोठा आघात झाला आणि आर्थिक संकट कोसळले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचे गणितच बिघडले.
या तरुणाची कहाणी ‘लोकमत’ने १९ जून रोजी प्रसिद्ध केली. मदतीचे आवाहनही केले. त्यानंतर लगेचच सांगलीच्या भगीरथ ग्रुपने या तरुणाला मदतीचा हात दिला. ग्रुपचे संचालक दीपककुमार पाटील यांनी हे वृत्त वाचल्यानंतर ‘लोकमत’शी संपर्क साधला आणि मदतीचा हात पुढे केला. भगीरथ ग्रुप आणि रोटरी क्लब आॅफ सांगली सिटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी रक्तदान, नेत्र व दंत तपासणी शिबिर पार पडले. या कार्यक्रमातच त्यांनी आप्पासाहेबच्या आजी कमल दगडू अर्जुन यांना दहा हजार रुपयांचा धनादेश दिला. उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर यांच्याहस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी संदीप हसबनीस, संतोष मोहिते, किरण तारळेकर उपस्थित होते.
दीपककुमार पाटील म्हणाले की, ‘लोकमत’मधील वृत्त वाचल्यानंतर माझ्या मनालाही वेदना झाल्या. अशी एखादी हिंसक घटना घडत असताना त्याचा फटका निष्पाप लोकांना कसा बसू शकतो, ही गोष्ट या घटनेतून समोर आली. आप्पासाहेबची परिस्थिती बिकट असल्याने त्याला आर्थिक मदत करण्याचा निर्णय ग्रुपने घेतला.
जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनीही जखमी म्हारगुडेची परिस्थिती पाहून सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)