सोनी, करोली (एम) येथे गारपीट

By Admin | Updated: April 10, 2015 00:37 IST2015-04-09T23:37:52+5:302015-04-10T00:37:17+5:30

चौघे जखमी : घरांवरील पत्रे उडाले; अवकाळी पावसाने हानी

Hail on Sony, Karoly (M) | सोनी, करोली (एम) येथे गारपीट

सोनी, करोली (एम) येथे गारपीट

सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह करोली (एम) परिसरामध्ये सोसाट्याचा वारा व गारपीटीसह पडलेल्या पावसाने जवळपास ५० हून अधिक घरांवरील छप्पर उडाले. तसेच घरांवरील पत्रे उडून लागल्याने चौघे जखमी झाले आहेत. अनेक घरे उघडी पडली आहेत. विजेचे खांबही पडले आहेत. नवीन द्राक्षबागांचे कोंब या पावसाने मोडले आहेत. पावसामुळे करोली (एम) परिसरात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विट्यातही तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.
सायंकाळी ५.१५ च्या दरम्यान सोनीसह करोली (एम) परिसरात गारपीटीसह पावसाने सुरुवात केली. सुरुवातीला १५ ते २० मिनिटे पावसाबरोबर मोठ्या प्रमाणात गारपीट सुरू होती. त्यानंतर सोसाट्याचा वारा सुरू झाल्याने परिसरातील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. पत्रे उडून लागल्याने आनंदराव पाटील, तसेच मैथिली श्रीकांत चव्हाण, समृध्दी श्रीकांत चव्हाण, दर्शनी श्रीकांत चव्हाण या तीन सख्ख्या बहिणी जखमी झाल्या आहेत.
करोली मळा भागातही घरांची मोठ्याप्रमाणात पडझड झाली असून त्याची माहिती घेण्याचे काम सर्कल बी. एस. नागरगोजे, तलाठी पोपट ओमासे, ग्रामपंचायत पदाधिकारी करीत होते. वाऱ्याने विजेचे खांबही पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नवीन लागण केलेल्या द्राक्षबागांचेही नुकसान झाले असून गारपीटीने कोंब मोडले आहेत. (वार्ताहर)


रांजणीत वीज कोसळून जनावरांचा मृत्यू
रांजणी : येथील उंबरओढा वस्तीवरील चंद्रकांत मारुती भोसले यांच्या राहत्या घरासमोर वीज पडून एक शेळी व दोन बोकडांचा मृत्यू झाला. गुरुवारी साडेपाचच्या सुमारास कडाडून वीज पडली. भोसले यांच्या घराजवळ दहा ते पंधरा शेळ्यांचा कळप होता. जोराने वारा सुटला होता. आभाळ भरून आले होते. वादळी वारे इतके जोराचे होते की, पुढचे काहीच दिसत नव्हते. यातच विजेचा जोरात आवाज झाला. वीज घरासमोरच पडल्यामुळे भीतीचे वातावरण दिसून आले. बाहेर पाहताच कळपातील एक शेळी व दोन बोकडांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तसेच एक लहान बोकड जखमी झाले. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी ए. ए. रुपनूर यांनी केला असून, त्यांची किंमत वीज हजाराच्या आसपास करण्यात आली आहे.



आगळगावात अवकाळी
ढालगाव : आगळगाव, शेळकेवाडी, घाटनांद्रे, तिसंगी परिसरात गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळासह अर्धा तास पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे बेदाण्याचे नुकसान झाले असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. आज दिवसभर मोठ्या प्रमाणात उष्णता वाढली होती. मात्र सायंकाळी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

जत तालुक्यात वादळी पाऊस
जत : तालुक्यातील तिकोंडी, बनाळी मुचंडी, रावळगुंडवाडी, दरीबडची या भागात गुरूवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे डाळिंब, द्राक्षे, आंबा, बेदाणा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. हा पाऊस उन्हाळी मका, कापूस, भुईमूग या पिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Web Title: Hail on Sony, Karoly (M)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.