सहदेव खोत --पुनवत -शिराळा तालुक्यात साधारण तीन महिन्यांच्या गाळपानंतर हंगाम संपल्याने गुऱ्हाळघरे विसावली आहेत. यावर्षी तालुक्यात सुमारे पंधरा गुऱ्हाळ घरांमध्ये एकूण सहा हजार टन उसाचे गाळप झाले, तर गुळाचा सरासरी दर २५०० ते २७०० इतकाच राहिल्याने, हंगाम तोट्यात गेल्याच्या प्रतिक्रिया गूळ उत्पादक व गुऱ्हाळ घरांमधून उमटल्या. तालुक्यात यावर्षी वारणा पट्ट्यात सुमारे १५ गुऱ्हाळघरांतील गाळपाला दिवाळीनंतर सुरूवात झाली. सुरूवातीलाच गूळ दराची समस्या निर्माण झाल्याने अनेक गुऱ्हाळ धारकांनी उशिरा गुऱ्हाळघरे चालू केली, तर अनेक मालकांनी हंगाम तोट्यात जाण्याच्या भीतीने गुऱ्हाळघरे सुरू केलीच नाहीत. या हंगामामध्ये करार केलेल्या कामगारांना सांभाळताना येथील गुऱ्हाळधारकांना आता तारेवरची कसरत करावी लागली. हंगामात सुरुवातीच्या दोन महिन्यात सर्वसाधारण गूळ उत्पादकांना क्विंटलला २००० च्या आसपासच दर मिळाला. गुळाचे दर पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी गुऱ्हाळाक डे पाठ फिरविली. त्यामुळे प्रारंभीचे दोन महिने गुऱ्हाळघरे पूर्ण क्षमतेने चालली नाहीत. त्यामुळे कामगारांबरोबरच गुऱ्हाळ मालकांनाही तोटा सहन करावा लागला. शिराळा व शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या काही मोजक्याच कलमांना मिळालेल्या ५००० पर्यंतच्या दराचा अपवाद सोडला, तर गूळदराची सरासरी वाढलीच नाही. गतवर्षीच्या हंगामाच्या अखेरची ३५०० पर्यंतची सरासरी यावर्षी केवळ २५०० ते २७०० पर्यंतच राहिली तालुक्यात साखर कारखान्यांच्या स्पर्धेतून गुऱ्हाळघरांतील गाळपाला ऊस शेतकऱ्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी अनेक गुऱ्हाळघरांतील हंगाम महिनाभर अगोदरच संपला. याचा परिणाम गूळ उत्पादनावर झाला.उत्पादक व गुन्हाळ मालकांत नाराजी एकंदरीत उत्पादन खर्च वाढलेल्या स्थितीत प्रचंड कष्टाने बनविलेल्या गुळास यंदाच्या हंगामात योग्य भाव न मिळाल्याने गूळ उत्पादक व गुऱ्हाळमालकांतून नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. यावर्षीचा हंगाम तोट्यात गेल्याने गुऱ्हाळ घरांचे मालक नाराजी व्यक्त करीत आहेत.
गुऱ्हाळघरे विसावली : हंगाम तोट्यात
By admin | Updated: March 17, 2016 23:48 IST