सांगलीत सव्वा कोटीचा गुटखा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:37+5:302021-02-05T07:21:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अन्न व औषध प्रशासनाने विविध कारवाईंमध्ये दोन वर्षांत जप्त केलेला सव्वा कोटीचा गुटखा मंगळवारी ...

सांगलीत सव्वा कोटीचा गुटखा नष्ट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अन्न व औषध प्रशासनाने विविध कारवाईंमध्ये दोन वर्षांत जप्त केलेला सव्वा कोटीचा गुटखा मंगळवारी नष्ट करण्यात आला. त्यामध्ये सुगंधी सुपारी, पान मसाला व गुटखा असा सुमारे ८ टन वजनाचा माल होता. भिलवडीतील एका कंपनीच्या बॉयलरमध्ये हा गुटखा नष्ट करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चौगुले म्हणाले, अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी जप्त केली आहे. मार्केट यार्ड येथील प्रशासनाच्या जुन्या कार्यालयात हा जप्त माल ठेवण्यात आला होता. २५ मार्च २०१९ पासून ते आतापर्यंत हा माल सुमारे ८ टन इतका होता. जिल्ह्यात केलेल्या ४८ कारवायांमधील हा माल होता. या प्रकरणात सुमारे ६० आरोपी होते. नष्ट केलेल्या गुटख्यामध्ये सर्फराज कच्ची याचा ३० लाख ७१ हजारांचा गुटखा, सुनील चव्हाण याचा १२ लाख, निखिल सूर्यवंशीचा १० लाख २२ हजार, मोहसीन शेखचा १३ लाख ७४ हजार रुपयांचा गुटखा, सुगंधी सुपारी, पानमसालाचा प्रामुख्याने समावेश आहे. एकूण १ कोटी २९ लाखांचा हा जप्त साठा होता.
मंगळवारी सकाळपासूनच चार ट्रकमधून जप्त माल भरून तो भिलवडीत नेण्यात आला. तेथे तो बॉयलरमध्ये टाकून नष्ट करण्यात आला. या वेळी वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी डी.एच. कोळी, स्मिता हिरेमठ, सी.आर. स्वामी, एस.ए. केदार, तानाजी कवळे, चंद्रकांत साबळे यांनी ही कारवाई केली.
फोटो ओळी :- अन्न व औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकून जप्त केलेला ८ टन गुटखा सोमवारी नष्ट केला.