शिरढोणजवळ ३५ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:25 IST2021-04-18T04:25:49+5:302021-04-18T04:25:49+5:30
कवठेमहांकाळ : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील शिरढोण येथे कवठेमहांकाळ पोलिसांनी तब्बल ३५ लाखांचा गुटखा पकडला. गुटख्याची व सुगंधी सुपारीची चोरटी वाहतूक ...

शिरढोणजवळ ३५ लाखांचा गुटखा पकडला
कवठेमहांकाळ : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील शिरढोण येथे कवठेमहांकाळ पोलिसांनी तब्बल ३५ लाखांचा गुटखा पकडला. गुटख्याची व सुगंधी सुपारीची चोरटी वाहतूक करणाऱ्या आसिर मुबारक गोलंदाज (सांगली वेस, मिरज) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक करीत त्याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली.
याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर गुटखा, सुगंधी सुपारी यांची चोरटी, अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस हवालदार राजू मानवर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, दादासाहेब ठोंबरे यांच्यासह पोलिसांनी शुक्रवारी रात्री राज्यमार्गावर सापळा लावला. वाहन तपासणीस सुरुवात केली. यावेळी मिरजेकडून शिरढोणकडे चारचाकी येत असल्याची पोलिसांनी बघितली. त्या गाडीतील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गुटखा, सुगंधी सुपारी, तंबाखू दिसून आली. हा अवैध साठा आणि वाहन असा ३५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही वाहतूक करणाऱ्या आसिर मुबारक गोलंदाज (सांगली वेस, मिरज) याच्यासह अज्ञात तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांची या महिन्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.