गुटखा तस्कर मोकाट, पानपट्टीचालक मात्र दाढेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:32 IST2021-02-17T04:32:11+5:302021-02-17T04:32:11+5:30

सांगली : बड्या गुटखा तस्करांना रान मोकळे सोडून पोटासाठी टपरी चालविणाऱ्या लहान व्यावसायिकांवर अन्न व अैाषध प्रशासनाची वक्रदृष्टी का? ...

Gutkha smuggler Mokat, Panpatti driver but bearded | गुटखा तस्कर मोकाट, पानपट्टीचालक मात्र दाढेला

गुटखा तस्कर मोकाट, पानपट्टीचालक मात्र दाढेला

सांगली : बड्या गुटखा तस्करांना रान मोकळे सोडून पोटासाठी टपरी चालविणाऱ्या लहान व्यावसायिकांवर अन्न व अैाषध प्रशासनाची वक्रदृष्टी का? असा सवाल पानपट्टी व्यावसायिकांनी केला. अन्न व अैाषध प्रशासनाकडून गेल्या महिन्याभरात गावोगावी पानटपऱ्यांवर धाडी टाकल्या जात आहेत, त्याच्याविरोधात पानपट्टी असोसिएशनने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

जिल्हाभरातून व्यावसायिक मोर्चात सहभागी झाले. असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, युसूफ जमादार, एकनाथ सूर्यवंशी, राजू पागे, सतीश रणदिवे, अशोक कारंडे, मकरंद जमदाडे, प्रकाश मोरे यांनी नेतृत्व केले. जिल्हाधिकारी व अन्न, अैाषध प्रशासनाला निवेदन दिले. प्रशासनाने सातत्याने कारवाया करत पानटपऱ्यांतून सुगंधी तंबाखू, गुटखा आदी पदार्थ जप्त केले आहेत. गुन्हे दाखल केले आहेत. याला विरोध करताना संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संघटनेने दोन-तीन वर्षांत गुटखा विक्री बंद ठेवली, पण किराणा दुकान व अन्यत्र सर्रास विक्री सुरू आहे. परराज्यातून आणून जादा दराने विकत पैसे कमवत आहेत. प्रशासन या बड्या तस्करांना सोडून छोट्या पानटपरी चालकांवर कारवाया करत आहे. पोलिसांत अडकवणे, दुकानांना सील ठोकणे अशा कारवाया सुरू आहेत. त्यांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. यामुळे गोरगरीब पानपट्टीचालक उदध्वस्त होत आहे. प्रशासनाने या कारवाया थांबवाव्यात. या व्यवसायात सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने आहेत. कारवाईमुळे त्यांना बेरोजगारीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सुगंधी तंबाखूवरील बंदी उठवावी.

चौकट

संगनमताने होणारी तस्करी रोखा

संघटनेने मागणी केली की, परराज्यातून गुटखा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. अन्न व अैाषध प्रशासनाच्या संगनमताने तस्करी सुरू आहे. ती प्रथम थांबवावी, मगच पानपट्टी व्यावसायिकांवर कारवाई करावी. कारवाया करायच्याच असतील, तर आम्ही दुकाने बंद ठेवतो, पण प्रत्येकाला सरकारने नोकरी द्यावी किंवा अन्य व्यवसायासाठी वीस लाखांचे बिनव्याजी कर्ज द्यावे.

Web Title: Gutkha smuggler Mokat, Panpatti driver but bearded