जिल्ह्यातील गुरुजींना लागले निवडणुकीचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:49+5:302021-02-06T04:47:49+5:30
शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आणि त्यांच्या संघटनांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे यंदाची ...

जिल्ह्यातील गुरुजींना लागले निवडणुकीचे वेध
शीतल पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक आणि त्यांच्या संघटनांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे यंदाची शिक्षक बँकेची निवडणूक चुरशीची होणार आहे. विद्यमान सत्ताधारी शिक्षक समितीला सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी शिक्षक संघटनांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. तर, समितीनेही गेल्या १० वर्षांतील कारभाराचा लेखाजोखा मांडत गुरुजींचा पाठिंबा मिळविण्यासाठी धडपड चालविली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकास एक लढत करण्यावर विरोधकांनी भर दिला आहे.
राज्य शासनाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दाखविल्यानंतर जिल्ह्यातील गुरुजींनी बँकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. प्राथमिक शिक्षक बँकेवर वर्चस्व मिळविण्यासाठी शिक्षक संघटनांत दरवेळी मोठा संघर्ष होतो. यंदाही तीच परिस्थिती दिसून येत आहे. सध्या बँकेवर शिक्षक समिती व पुरोगामी सेवा मंडळाची सत्ता आहे. गेली ११ वर्षे समितीच्या ताब्यात बँकेची सूत्रे आहेत. याआधी पाच वर्षांनंतर बँकेत परिवर्तन होत होते. पण, गतवेळी विरोधी शिक्षक संघात पडलेल्या फुटीचा लाभ समितीला झाला होता.
गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील शिक्षक संघटनांना बँकेच्या निवडणुकीचे वेध लागले होते. आता प्रत्यक्षात निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. समितीला यंदा हॅट् ट्रिकपासून रोखण्यासाठी सर्व विरोधी संघटनांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी, असा सूर निघत आहे. शिक्षक संघातील शि.द. पाटील व संभाजीराव थोरात गट एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण, त्यात अडचण शि.द. पाटील गटातील फुटीची आहे. हा गट सध्या शि.द. पाटील यांचे चिरंजीव माधवराव पाटील व नातू शंभोराज पाटील यांच्या विभागाला गेला आहे. या दोन्ही गटाला एकत्र आणण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, जुनी पेन्शन संघटना, शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक संघटना यासह अनेक लहानमोठ्या संघटनांना सोबत घेण्याची भूमिका विरोधकांनी घेतली आहे. त्यामुळे यंदा सत्ताधारी समितीसमोरही मोठे आव्हान असेल.
चौकट
परजिल्ह्यातील मतदार रडारवर
शिक्षक बँकेचे कार्यक्षेत्र वाढविल्याने पहिल्यांदाच सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील मतदारही निवडणुकीत मतदान करणार आहे. परजिल्ह्यात जवळपास १००० ते १२०० मतदार आहेत. गत निवडणुकीत शिक्षक समिती व थोरात गटाला जवळपास समसमान मते मिळाली होती. शि.द. पाटील गटाला १४०० ते १५०० मते मिळाली. ही मतेच निर्णायक ठरली होती. यंदा थोरात व शि.द,. पाटील गट एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यात परजिल्ह्यात वाढलेले मतदार निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी या मतदारांवर सत्ताधारी व विरोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे.