इस्लामपुरातील गुंड प्रकाश पुजारी वर्षभरासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST2021-02-13T04:26:28+5:302021-02-13T04:26:28+5:30
इस्लामपूर : येथील औद्योगिक परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार प्रकाश ऊर्फ पक्या महादेव पुजारी (वय २५) याला झोपडपट्टी दादा ...

इस्लामपुरातील गुंड प्रकाश पुजारी वर्षभरासाठी स्थानबद्ध
इस्लामपूर : येथील औद्योगिक परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार प्रकाश ऊर्फ पक्या महादेव पुजारी (वय २५) याला झोपडपट्टी दादा कायद्याखाली एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. पुजारी सध्या कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात असून, तिथे जाऊन पोलिसांनी या कारवाईची अंमलबजावणी केली. पोलिसांची शहरातील ही चौथी कारवाई ठरली आहे.
औद्योगिक वसाहत परिसरात पक्या पुजारीची प्रचंड दहशत आहे. साथीदारांना सोबत घेत त्याने अनेक गुन्हे केले आहेत. खुनाचा प्रयत्न, मारामारी, लूटमार, दहशत माजविणे अशा प्रकारचे सात गुन्हे त्याच्याविरुद्ध नोंद आहेत.
त्याच्या या कारवायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी प्रकाश पुजारी याच्यावरील झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर पुजारी याला स्थानबद्ध करण्याचे आदेश मंजूर केले.
शहर आणि परिसरात गुन्हेगारी, सावकारी करणाऱ्या सुहेल बारस्कर, रवी खोत, गजराज पाटील अशा तिघांवर यापूर्वी झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.
फोटोे - १२०२२०२१-आयएसएलएम-प्रकाश पुजारी