गुंठेवारीतील कामे थांबविली
By Admin | Updated: December 17, 2015 01:25 IST2015-12-16T23:58:39+5:302015-12-17T01:25:04+5:30
स्थायी समिती सभा : सदस्यांचा विरोध; दीड कोटीचा निधी मंजूर

गुंठेवारीतील कामे थांबविली
सांगली : गुंठेवारी नियमितीकरणांतर्गत प्रशमन व विकास शुल्क न भरलेल्या भागात विकासकामे करण्याचा डाव बुधवारी स्थायी समिती सभेत हाणून पाडला. काँग्रेससह राष्ट्रवादीच्या सदस्यांनी ही कामे थांबवून त्याची फेरपडताळणी करण्याची मागणी केली. सभापती संतोष पाटील यांनीही या कामाची निविदा प्रसिद्ध न करता त्या फायली पुन्हा स्थायीकडे सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सभापती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायी समितीची सभा झाली. या सभेत राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते यांच्यासह इतर सदस्यांनी गुंठेवारी भागात दीड कोटीच्या कामांवर आक्षेप घेतला. प्रशमन व विकास शुल्क न भरलेल्या भागात ही कामे होत आहेत. त्यामुळे शुल्क भरलेल्या नागरिकांवर अन्याय होणार आहे. यापूर्वी स्थायी समितीने ही कामे थांबविण्याचे आदेश दिले होते. तरीही बांधकाम विभागाकडून या कामाच्या निविदा प्रसिद्ध करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पाटील यांनी निविदा प्रसिद्ध न करता त्या फाईली पुन्हा स्थायीकडे सादर करण्याचे आदेश दिले.
कुपवाड येथील भारत सूतगिरणी ते जकात नाका या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरात पॅचवर्कचे काम सुरू असताना, या रस्त्यावरही पॅचवर्क करावे, अशी मागणी शेडजी मोहिते यांनी केली. एलबीटी विभागाकडील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांची शिपाई म्हणून नव्या कार्यालयात नियुक्ती करावी, असा मुद्दा मोहिते यांनी मांडला. त्यावर उपायुक्त सुनील नाईक यांनी आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. निर्मला जगदाळे यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे समान वाटप झाले नसल्याचे सांगितले. अनेक कार्यालयात सफाई कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना मूळ जागेवर परत पाठविण्याचे आदेशही झाले आहेत. पण ते काम करण्यास तयार नाहीत. चारही प्रभाग समितीत सफाई कर्मचाऱ्यांचे असमान वाटप झाल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
सुरक्षारक्षक विनावेतन!
कुपवाडच्या नवीन प्रशासकीय इमारतीत सुरक्षारक्षक नाहीत. आताच दोन खिडकीच्या काचा फोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी तीन सुरक्षारक्षक नियुक्त करावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर प्रशासनाने सध्या जे सुरक्षारक्षक कार्यरत आहेत, त्याचेच पगार देण्यात आलेले नसल्याने नवीन नियुक्ती करता येणार नाही, असा खुलासा केला.