गुलाब कॉलनीतील अतिक्रमणे जमीनदोस्त
By Admin | Updated: May 14, 2016 00:51 IST2016-05-14T00:48:42+5:302016-05-14T00:51:29+5:30
महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की : जेसीबीसमोर महिलेचा ठिय्या; प्रचंड तणावामुळे मोठा पोलिस बंदोबस्त

गुलाब कॉलनीतील अतिक्रमणे जमीनदोस्त
सांगली : शहरातील शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महापालिकेच्या खुल्या भूखंडावरील अतिक्रमण हटविताना शुक्रवारी प्रचंड तणाव निर्माण झाला. अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. एक महिला तर अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेली. यातून अधिकारी व भाडेकरू यांच्यात जोरदार वादावादी झाली. अखेर सहा तासानंतर पोलिस बंदोबस्तात पाच ते सहा घरे जेसीबी लावून जमीनदोस्त करण्यात आली .
शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीत तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या नावावर बारा गुंठ्याचा खुला भूखंड आहे. या भूखंडावर पत्र्याचे शेड मारून ते भाड्याने देण्यात आले होते. याबाबत विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी महापालिका आयुक्त व सहायक आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. काही दिवसांपूर्वी आणखी पत्र्याचे शेड मारण्याचे काम सुरू होते. तरीही प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. दोन दिवसांपूर्वी सूर्यवंशी यांनी पत्रकार बैठक घेऊन प्रशासनावर तोफ डागली. त्यानंतर शुक्रवारी प्रशासनाला जाग आली.
महापालिकेच्या सुमारे बारा गुंठे खुल्या जागेवर मूळ जागा मालक संपत पवार याने जुन्या सात-बाराच्या आधारे पंधरा वर्षापासून बेकायदेशीर शेड बांधूून भाडेकरु ठेवले होते. १९८४ ला तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या नावावर ही जागा झालेली आहे. असे असताना जुन्या सात-बाराच्या आधारे १९९१ मध्ये संपत पवार याने या जागेवर बेकायदेशीर शेड बांधले होते.
शुक्रवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक गुलाब कॉलनीत दाखल झाले. सहायक आयुक्त रमेश वाघमारे, अभियंता परमेश्वर हलकुडे, वैभव वाघमारे, नगररचना अधिकारी संजय कांबळे, अभियंता डी. डी. पवार यांनी या खुल्या भूखंडावरील अतिक्रमित शेड काढायला सुरुवात केली. तेव्हा एका महिलेने ही जागा विकत घेतल्याचे सांगत खरेदीपत्र सादर केले. पण ते बेकायदेशीर असल्याचे सांगत पालिकेच्या पथकाने कारवाई सुरूच ठेवली. या महिलेने दारातच ठिय्या मारल्याने तणावाचे वातावरण झाले. सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांनी सरळ विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले, पण पोलिसांनी नेहमीप्रमाणे सकाळी कळवले का नाही? ही वेळ आहे काय? असे सुनावले. यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. शेवटी सायंकाळी पाच वाजता पोलिस बंदोबस्त मिळाला. तोपर्यंत तेथे तणावाची स्थिती कायम होती.
यावेळी मूळ जागामालक संपत पवार यांनी, दोन दिवसांची मुदत द्या, सोमवारी न्यायालयातून स्थगिती आणतो, असे सांगून कारवाई थांबविण्याची विनंती केली. पण पालिकेच्या पथकाने त्यांची मागणी फेटाळून लावली. दरम्यान, या शेडमधील महिलांनीही पवारांना धारेवर धरले. शेवटी पोलिसांनी, महापालिकेने कारवाई करावी, विरोध कराल तर गुन्हा दाखल करु, असा इशारा देताच विरोध करणारे माघारी फिरले. तरीही एका महिलेने विरोध केलाच. शेवटी खोलीतील साहित्य बाहेर काढून जेसीबीने अतिक्रमण हटवले.
यावेळी संबंधित महिला सहायक आयुक्त वाघमारे यांच्या अंगावर धावून गेली. यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही सर्व अतिकमणे जमीनदोस्त केली होती. (प्रतिनिधी)