अतिथीगृह, प्रसुतीगृहाचीही इमारत पाडणार

By Admin | Updated: August 11, 2015 23:42 IST2015-08-11T23:42:28+5:302015-08-11T23:42:28+5:30

महापालिकेचा निर्णय : २० आॅगस्टपासून सुरू होणार काम; प्रशासनाची मंजुरी

The guest house, the building of a maternity house, will be destroyed | अतिथीगृह, प्रसुतीगृहाचीही इमारत पाडणार

अतिथीगृह, प्रसुतीगृहाचीही इमारत पाडणार

सांगली : बीओटी किंवा पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप) अंतर्गत सांगलीतील महापालिकेच्या अतिथीगृहाची व प्रसुतीगृहाची इमारत विकसित करण्यात येणार आहे. तूर्त ही इमारत २0 आॅगस्टपासून पाडण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. प्रशासनानेही इमारत उतरविण्यासाठी हिरवा कंदील दर्शविल्याची माहिती महापौर विवेक कांबळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली. सांगलीतील अतिथीगृहाच्या इमारतीच्या जागेत अलिशान व्यापारी संकुल उभारण्याचा विचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता. आता याला मूर्तस्वरुप प्राप्त होणार आहे. तत्कालीन नगरपालिकेच्या कालावधित ही इमारत बांधण्यात आली आहे. ही इमारत सध्या धोकादायकही बनली आहे. त्यामुळे ही इमारत बीओटी किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून विकसित करण्याचा विचार महापालिकेत सुरू होता. महापौर कांबळे यांनी अतिथीगृहासह नजीकच असलेली प्रसुतीगृहाची इमारतही नव्याने बांधण्याचा प्रस्ताव दिला आहे. प्रशासनानेही याबाबत हिरवा कंदील दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. २0 आॅगस्टपासून इमारत उतरविण्याचे काम सुरू होईल.
महापौर म्हणाले की, खासगीकरणातून इमारती उभारताना रितसर निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. महापालिकेला या माध्यमातून जास्तीत जास्त आर्थिक फायदा होईल, तसेच या इमारतीसुद्धा चांगल्या पद्धतीने विकसित होतील, याची खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी खासगीकरणातून झालेल्या त्रुटी सुधारून हा प्रकल्प राबविण्यात येईल. त्यासाठीची तयारी आता झालेली आहे. प्रसुतीगृह, जन्म-मृत्यू विभाग व अन्य कार्यालयांचे स्थलांतर महापालिकेच्या रिकाम्या इमारतींमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी काही पर्यायही उपलब्ध आहेत, असे त्यांनी सांगितले. दोन्ही इमारतींच्या जागेचा विचार केला, तर याठिकाणी दोन वेगवेगळी संकुले उभारण्यात येऊ शकतात. (प्रतिनिधी)

धोरणात्मक निर्णयाची आवश्यकता
महापौरांचा हा प्रस्ताव महासभेत चर्चेला येणे आवश्यक आहे. येत्या महासभेत याविषयीची चर्चा होण्याची शक्यता आहे. महापौरांमार्फतच हा विषय महासभेपुढे चर्चेला येण्याची शक्यता आहे. धोरणात्मक निर्णयानंतरच निविदा प्रक्रियेला सुरुवात करता येणार असल्याने, अजून यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो.


इमारतीला झाली चाळीस वर्षे
अतिथीगृहाची इमारत तत्कालीन नगरपालिकेच्या कालावधित १४ एप्रिल १९७४ रोजी उभारण्यात आली आहे. चाळीस वर्षांपूर्वीची ही इमारत असून वरच्या मजल्यांवरील बांधकाम खचले आहे. काळवंडलेल्या या इमारतीला केवळ रंगरंगोटीशिवाय काहीही केलेले नाही. त्यामुळे वारंवार किरकोळ पडझड होतच आहे. या इमारतीमध्ये पूर्वी सहा विभागांचे कामकाज सुरू होते. आता जन्म-मृत्यू, मालमत्ता विभाग आहे. हे दोन्ही विभाग स्थलांतरित करण्यात येणार आहेत.

Web Title: The guest house, the building of a maternity house, will be destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.