जीएसटी महसुलात अजूनही ११९ कोटींची घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:16 IST2021-03-30T04:16:23+5:302021-03-30T04:16:23+5:30
सांगली : जिल्ह्यात थकीत जीएसटी वसुलीसाठी केंद्रीय जीएसटी विभागामार्फत लगबग सुरु आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ११९ कोटींची तूट ...

जीएसटी महसुलात अजूनही ११९ कोटींची घट
सांगली : जिल्ह्यात थकीत जीएसटी वसुलीसाठी केंद्रीय जीएसटी विभागामार्फत लगबग सुरु आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी ११९ कोटींची तूट जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात दिसत आहे. त्यामुळे ३१ मार्चपूूर्वी करदात्यांनी त्यांचा थकीत कर भरावा, असे आवाहन विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर गोहिल यांनी केले आहे.
गोहिल यांनी पत्रकात म्हटले आहे की, पाच कोटीपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असणारे तसेच मासिक विवरणपत्र भरण्याचा पर्याय घेतलेले इतर करदाते यांच्यासाठी फेब्रुवारी २०२१चा कर भरणा व विवरणपत्र ३ बी भरण्याची मुदत २० मार्चपर्यंत देण्यात आली होती. ज्यांची वार्षिक उलाढाल पाच कोटींच्या आत आहे आणि ज्यांनी तिमाही विवरणपत्र भरण्याचा पर्याय घेतला आहे, अशांना फेब्रुवारी २१चा जीएसटी २५ मार्चपर्यंत भरणे आवश्यक होते. ज्यांनी आपला करभरणा व विवरणपत्र सादर केले नाही, अशा लोकांनी तत्काळ ते सादर करावे. सर्व करदात्यांनी यापूर्वीची प्रलंबित विवरणपत्रे, कर भरणा, व्याज व इतर काही थकबाकी असेल त्याचा भरणा हा ३१ मार्चपूर्वी करून विभागास सहकार्य करावे. याबाबत जीएसटी विभागाचे अधीक्षक मकरंद कुलकर्णी, जीएसटी सेवा केंद्राचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मेढेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोहिल यांनी केले आहे.
चौकट
अकरा महिन्यात ६९४ कोटी जमा
आर्थिक वर्ष संपताना महसूल गोळा करण्याच्या उद्देशाने विभाग प्रयत्न करीत आहेत. मात्र, २०१९ - २० या आर्थिक वर्षात सुमारे ८१३ कोटीचा महसूल जमा झाला होता. आता एप्रिल २० ते फेब्रुवारी २१ या ११ महिन्यात तो ६९४ कोटी इतकाच आहे. अद्याप ११९ कोटींची तूट दिसत आहे.