वाढत्या थंडीचा द्राक्षाला फटका
By Admin | Updated: December 22, 2016 00:09 IST2016-12-22T00:09:00+5:302016-12-22T00:09:00+5:30
जत तालुक्याचे चित्र : मण्यांची फूग संथ

वाढत्या थंडीचा द्राक्षाला फटका
गजानन पाटील ल्ल संख
जत तालुक्यात १५ दिवसांपासून थंडीची लाट सुरू आहे. रात्री बोचरी थंडी, दिवसा गुलाबी थंडीचा अनुभव येत आहे. गारठ्यामुळे वाढीच्या स्थितीतील द्राक्षमण्यांची फूगही संथ असून, थंडीचा परिणाम द्राक्षमण्यांच्या वाढीवर होऊ लागला आहे.
तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातींच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील पाणी असल्याने सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.
उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, संंख, अंकलगी, भिवर्गी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, कोंत्यावबोबलाद, करजगी, जालिहाळ बु. आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. गेल्या दोन वर्षांपासून पाऊस कमी झाल्याने द्राक्षबागा अडचणीत आल्या आहेत. छाटण्या झालेल्या नाहीत. टॅँकरने पाणी घालून उन्हाळ्यात कांड्या तयार केल्या आहेत. थोड्या प्रमाणात पडलेल्या पावसावर फळबागा जगविल्या आहेत.
डिसेंबर महिन्यामध्ये थंडी वाढू लागली आहे. रात्री १० अंशापर्यंत, तर दिवसा दुपारी १२ वाजताही २२ अंशापर्यंत तापमान असते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किमान १० व कमाल २२ अंश तापमान राहील, असा अंदाज आहे. त्याचा परिणाम द्राक्षावर होत आहे.
हवामानाचा फटका : रोगांची भीती
सप्टेंबरमध्ये छाटणी घेतलेल्या द्राक्षबागांतील घडांच्या मण्यांची वाढ सुरु झाली आहे. परंतु वाढत्या थंडीमुळे द्राक्षमण्यांच्या फुगवण क्षमतेवर परिणाम होत आहे. त्यामुळे द्राक्षमणी जास्त फुगू शकत नाहीत. पण सध्या पाणी उतरुन तयार झालेल्या मालावर थंडीचा फारसा परिणाम होत नाही. मात्र उर्वरित बागांमध्ये थंडी व दाट धुके पडल्यास भुरीसारख्या रोगांचा शिरकाव पुन्हा होऊ शकतो, असे द्राक्षबाग तज्ज्ञांनी सांगितले. द्राक्ष मण्यांची वाढ करण्यासाठी एसओपी खताचा वापर शेतकरी करीत आहेत.
बेदाण्यावर परिणाम
मण्यांची फुगवण कमी होणार असल्याने चांगला दर्जेदार प्रतीचा बेदाणा तयार होणार नाही. दुय्यम प्रतीचा बेदाणा तयार होणार आहे. याचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसणार आहे.