किराणा माल संपला, भाजीपाला परवडत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:35+5:302021-05-13T04:27:35+5:30

इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे इस्लामपूर शहरातील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची होरपळ होत ...

Groceries run out, vegetables unaffordable! | किराणा माल संपला, भाजीपाला परवडत नाही !

किराणा माल संपला, भाजीपाला परवडत नाही !

इस्लामपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे इस्लामपूर शहरातील हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची होरपळ होत आहे. प्रत्येकाने कुवतीनुसार घेऊन ठेवलेला किराणा माल संपल्याने फरफट होऊ लागली आहे, तर भाजीपालाही मिळत नसल्याचे चित्र आहे.

गेल्या मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यावर शहरासह परिसरात अनेक कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरावर भीतीचे साम्राज्य दाटले होते. त्यावेळी या साथीच्या भीतीने नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले. त्यावेळी काही लोकप्रतिनिधी, समाजसेवक, युवक मंडळे आणि सामाजिक संस्था मदत करण्यात आघाडीवर होत्या. सामान्य कुटुंबांसह मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांना त्या मदतीच्या बळावर काळ व्यतीत करता आला.

आता पुन्हा दुसऱ्या लाटेने तोंडचे पाणी पळवले आहे. या साथीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात आठ दिवसांपासून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे कायद्याच्या धाकापोटी व्यापाऱ्यांनी दारे लावून घेतली आहेत. या परिस्थितीत हातावर पोट असणाऱ्या आणि मोलमजुरी करून जगणाऱ्या कुटुंबांची परवड होऊ लागली आहे. कोणाचा शिधा संपला, तर अनेकांना भाजीपाला घेणे दुरापास्त होत आहे. त्यातच या दुसऱ्या लाटेत मदतीचे हात आखडते असल्याने अनेक कुटुंबे जगण्यासाठी हतबल झाली आहेत.

चौकट

दातृत्वाचा हात गेला कोठे?

शहरामध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी राजकीय पुढाऱ्यांसह समाजाच्या सर्व स्तरांतून सामान्य कुटुंबांसाठी मदतीचा मोठा ओघ सुरू होता. कोणी अन्नदान केले, तर कोणी महिनाभर पुुरेल इतका शिधा दिला. मात्र, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ही सर्व मदत गायब झाल्याचे चित्र आहे.

Web Title: Groceries run out, vegetables unaffordable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.