उसावर करपा, भाताची वाढ खुंटली
By Admin | Updated: August 4, 2015 23:40 IST2015-08-04T23:40:57+5:302015-08-04T23:40:57+5:30
कमी पावसाचा फटका : सोयाबीन वगळता शिराळा तालुक्यात पिके असमाधानकारक

उसावर करपा, भाताची वाढ खुंटली
सहदेव खोत -पुनवत -शिराळा तालुक्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने पीकपरिस्थिती असमाधानकारक आहे. तालुक्यात सर्वत्रच उसावर करपा व लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला आहे. भाताची अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही. परिणामी शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. कमी पावसामुळे तणांना पोषक वातावरण असून, यावर शेतकऱ्यांची शक्ती वाया जात आहे.
शिराळा तालुक्यात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाला आहे. आषाढ हा पावसाचा महिना. या महिन्यात सर्वत्र झडीचा पाऊस सुरू असतो. मात्र आतापर्यंत पावसाची परिस्थिती चांगली नसल्याने, ओढ्या-नाल्यांना पाण्याची खळखळ नाही. वाफ्यांमध्ये अद्याप पाणी साचलेले नाही. तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. तालुक्यातील पाऊस पाण्याचे चित्र विस्कटले आहे.कमी पावसाचा परिणाम ऊस व भात या पिकांवर झाला आहे. उसावर करपा व लोकरी माव्याने आक्रमण केले आहे. उसाची पाने करपल्याने जनावरांना चांगल्या दर्जाचा ओला चारा मिळेनासा झाला आहे. तालुक्याच्या भात या प्रमुख पिकाची स्थितीही असमाधानकारक आहे. भातवाफ्यात पाणी नाही. वाढ पुरेशी झालेली नाही. तणांचा जोर वाढला आहे. भातवाफ्यात शेतकऱ्यांना हात धुवायलाही पाणी नाही. ऊस व भात या पिकांच्या वाईट स्थितीमुळे शेतकरी चिंतातूर आहे. तालुक्यात फक्त सोयाबीन, भुईमूग या दोन तेलवर्गीय पिकांनाच कमी पावसामुळे काही प्रमाणात ‘अच्छे दिन’ आहेत. या दोनच पिकांची बऱ्यापैकी उगवण झाली आहे. सोयाबीन, भुईमुगाची परिस्थिती काहीशी चांगली असल्याने शेतकऱ्यांना तेवढाच दिलासा मिळाला आहे.एकंदरीत शेतकऱ्यांनी पिकांवर खते, बियाणे, तणनाशके, कीडनाशके यासाठी मोठा खर्च करूनही ऊस व भात या प्रमुख दोन पिकांची कुचंबणा झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न घटणार आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत.