जिल्हा परिषद पदाधिकारी बदलास फडणवीसांचा हिरवा कंदील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:41+5:302021-08-26T04:28:41+5:30
सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलास भाजपचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. ...

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलास फडणवीसांचा हिरवा कंदील
सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलास भाजपचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. इच्छुक सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला आहे; पण पदाधिकारी बदलावरून भाजपच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेला संघर्ष संपविण्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर आव्हान आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर जिल्ह्यातील येथे प्रत्येक भाजप नेत्यांची व्यक्तीगत भेट घेऊन जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाबाबतची भूमिका जाणून घेतली होती. शिराळा, वाळवा, आटपाडी, खानापूर, मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील भाजप नेत्यांनी पदाधिकारी बदलाची भूमिका घेतली आहे. सामान्य जिल्हा परिषद सदस्यालाही पदाची संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. आठ दिवसांनी फडणवीस पदाधिकारी बदलाबाबत भूमिका स्पष्ट करणार होते. त्यांनी बुधवारी भाजपच्या एका नेत्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे. तुम्ही जबाबदारी घेणार असाल तर पदाधिकारी बदल करण्यास काही हरकत नाही. येत्या दोन दिवसात पुन्हा सांगली जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांशी फडणवीस चर्चा करणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे या आठवड्यातच राजीनामे घेण्यात येणार आहेत.
फडणवीस यांनी जि. प. पदाधिकारी बदलास हिरवा कंदील दाखविला असला, तरी भाजप नेत्यांमध्येच मोठा संघर्ष आहे. खासदार संजयकाका पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यामध्ये टोकाचा संघर्ष आहे. संजयकाका पदाधिकारी बदलाच्या बाजूचे असले तरी देशमुख, जगताप पदाधिकारी बदल नको म्हणत आहेत. यामुळे या तीन नेत्यांमधील वाद मिटविण्याचे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.
चौकट
नेत्यांमधील संघर्षाचा इच्छुकांना फटका
भाजप नेत्यांमधील संघर्षामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी बदल लांबला आहे. यामध्ये पदाधिकारी होण्यासाठी सामान्य जि. प. सदस्य इच्छुक असूनही त्यांची नेत्यांच्या संघर्षात फरपट सुरू झाली आहे. या सदस्यांना भाजप नेते न्याय देणार आहेत की नाही, असा सवालही जिल्हा परिषद सदस्यांनी उपस्थित केला आहे.