कवठेएकंदमध्ये विशेष पथकाकडून झाडाझडती
By Admin | Updated: May 7, 2015 00:31 IST2015-05-07T00:31:11+5:302015-05-07T00:31:24+5:30
पोलीस अधिकाऱ्यांचा ठिय्या : मंडळे, परवानाधारकांची तपासणी

कवठेएकंदमध्ये विशेष पथकाकडून झाडाझडती
तासगाव : कवठेएकंद (ता. तासगाव) येथे फटाके तयार करताना ईगल फायर वर्क्समध्ये झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली. दोन विशेष पोलीस पथकांच्या माध्यमातून बुधवारी दिवसभर गावात झाडाझडती घेण्यात आली. दारू शोभा मंडळे, परवानाधारक व्यावसायिकांसह काही संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. गावात दिवसभर पोलीस आणि अधिकाऱ्यांचा ठिय्या होता.कवठेएकंद येथील ईगल फायर वर्क्समध्ये फटाके तयार करताना झालेल्या भीषण स्फोटात अकरा जणांचा भाजून मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून गावातील वातावरण सुन्न आहे. या घटनेनंतर या फटाक्यांच्या कारखान्याचे मालक रामचंद्र गुरव यांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियम व अटींचे पालन न करता फटाक्यांची निर्मिती होत असल्यामुळेच असे अपघात होऊन लोकांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवारी कवठेएकंदमध्ये पोलीस निरीक्षक ए. के. चोरमुले आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक शहाणे यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करुन विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. दसरा उत्सवाच्यावेळी फटाके तयार करणारी शोभा मंडळे, परवानाधारक व्यावसायिक यांच्या कारखान्यांची कसून तपासणी करण्यात आली. दारुचा साठा आणि इतर कायदेशीर बाबींचीही तपासणी करण्यात आली. गावात दिवसभर तपासणी मोहीम सुरु होती. ४० हून अधिक ठिकाणांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण होते.
यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मीकांत पाटील, तासगावचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, पोलीस निरीक्षक रमेश बनकर दिवसभर गावात ठाण मांडून होते. (वार्ताहर)
पतंगराव कदम यांची घटनास्थळी भेट
कवठेएकंद येथील भीषण स्फोटानंतर गेले दोन दिवस वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, नेतेमंडळींची येथे वर्दळ वाढली आहे. बुधवारी माजी मंत्री आणि आमदार पतंगराव कदम यांनी घटनास्थळी पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्फोट झालेल्या ईगल फायर वर्क्स या फटाक्याच्या कारखान्याचे मालक रामचंद्र गुरव यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली.