वाळवा तालुक्यातील कोरोनाचा आलेख उतरतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:22 IST2021-05-30T04:22:55+5:302021-05-30T04:22:55+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण ...

वाळवा तालुक्यातील कोरोनाचा आलेख उतरतीला
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील दुसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचा आलेख उतरत असल्याचे आशादायी चित्र आहे.फेब्रुवारी महिन्यापासून आतापर्यंत ११७ दिवसात ग्रामीण भागात ५९५३ तर इस्लामपूर १६६७ आणि आष्टा येथे ४८४ रुग्णांची नोंद झाली. ग्रामीणचा मृत्यूदर हा २.७२ तर शहरी भागात हेच प्रमाण २.८२ टक्के इतके राहिले आहे.
पहिल्या लाटेच्या तुलनेत तालुक्यातील कोरोना संसर्गाची वाढती स्थिती आता हळूहळू खाली येत आहे.गेल्यावेळी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात उच्चांक झाला तो यावेळी १५ एप्रिल ते १५ मे या काळात पुन्हा अनुभवास आला.मात्र आता संसर्गाची व्याप्ती कमी होत असल्याचे समोर येणाऱ्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
या दुसऱ्या लाटेत येलूर आणि परिसरातील ८ गावांमध्ये ३८९ कोरोना बाधीत रुग्ण सापडले.तर १९ जणांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ४.८८ टक्के इतका राहिला आहे. त्याखालोखाल कासेगाव परिसरातील ६ गावात ४५२ बाधित रुग्ण असून त्यातील १६ जणांचा मृत्यू झाला आहे. इथे ३.५३ इतक्या मृत्यूदराची नोंद झाली. येडेमच्छिद्र आणि बाजूच्या १० गावात ३८१ रुग्ण होते. तर १३ जण दगावले. हा मृत्यूदर ३.४१ असा आहे. पेठ परिसरातील ११ गावांमध्ये ६२३ रुग्ण आणि २० जणांचा मृत्यू झाला. तेथे हे प्रमाण ३.२१ इतके आहे.
कामेरी आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६३८ रुग्ण होते आणि ८ रुग्ण दगावले. या ठिकाणी सर्वात कमी मृत्यूदराची नोंद झाली. येथे हे प्रमाण १.२५ इतके राहिले. त्यानंतर नेर्ले आणि लगतच्या ८ गावात ५२७ रुग्ण होते. त्यातील ९ जण दगावले. येथे मृत्यूचे प्रमाण हे १.७० असे राहिले. कुरळप आणि तेथील १४ गावात रुग्णसंख्या ६७५ होती तर २० जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी २.९६ इतका मृत्यूदर आहे. वाळवा आणि परिसरातील ६ गावांमध्ये ६१५ रुग्ण होते. त्यातील १७ रुग्ण दगावले. येथे २.७६ इतका मृत्यूदर आहे.
बोरगाव आणि त्याखालील ९ गावात ७५१ बाधित रुग्ण होते. तर २० जणांचा मृत्यू झाला. या परिसराचा मृत्यूदर हा २.६६ टक्के राहिला. बावची परिसरातील ७ गावांमध्ये ४७४ रुग्ण आणि ११ जणांचा मृत्यू यामध्ये हे प्रमाण २.३२ इतके होते. बागणी आणि लगतच्या ९ गावातून ४२८ रुग्णांची नोंद झाली.तर ९ जणांचा मृत्यू झाला. याठिकाणी २.१० टक्के इतका मृत्यूदर राहिला.