द्राक्षबागायतदारांनी घेतला दावण्या, भुरीचा धसका

By Admin | Updated: October 27, 2014 23:26 IST2014-10-27T23:26:29+5:302014-10-27T23:26:29+5:30

औषधांचा खर्च झाला दुप्पट

The grapevine collectors, the bhuri jhana | द्राक्षबागायतदारांनी घेतला दावण्या, भुरीचा धसका

द्राक्षबागायतदारांनी घेतला दावण्या, भुरीचा धसका

तासगाव : द्राक्षपंढरी तासगाव तालुक्यात सध्या बदललेल्या वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असणारी औषधांची फवारणी अद्यापही सुरूच आहेत. दावण्या, भुरीचा धसका घेतलेल्या द्राक्षबागायतदारांनी औषधांची फवारणी न थांबता सुरू ठेवली आहे. सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी, ढगाळ वातावरण कायम आहे.
तासगाव परिसरासह ग्रामीण भागात सर्वत्र द्राक्षबागांवर औषधांची दोन—तीनदा फवारणी झाली आहे. हजारो रुपयांचा चुराडा करून बागायतदार औषधांच्या फवारण्या करत असल्याचे चित्र आहे. बहुतांशी भागात बागांवर दावण्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. दावण्या आटोक्यात आणण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आता नक्की नुकसान किती झाले, याचा अंदाज बांधता येत नसला तरी, नुकसान हे नक्कीच झाले आहे. द्राक्षबागांमध्ये सध्या दावण्याची लागण झालेले द्राक्षांचे घड, पाने कापून टाकली जात आहेत. बऱ्याच ठिकाणी घडांचा खच पडल्याचे चित्र आहे. संकेतस्थळावरून हवामानाचा वेध घ्यायचा व दुसऱ्या बाजूला औषधांचा मारा सुरू ठेवायचा, अशा दुहेरी भूमिकेतून सध्या बागायतदारांचे काम सुरू आहे. (वार्ताहर)
ढगाळ हवामानाचा फटका : भुरी, दावण्याचा प्रादुर्भाव
पावसामुळे द्राक्षबागांंच्या औषधांचा खर्च झाला दुप्पट
दरीबडची : ढगाळ हवामान, रिमझिम पाऊस यामुळे जत तालुक्यातील द्राक्षबागांवर दावण्या, भुरी, स्ट्रिप्स आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. फ्लॉवरिंग असलेल्या द्राक्षघडातील मणी गळणे, कुजणे, फुलोरा झडणे आदींसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. संपूर्ण बागच वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शुक्रवारपासून अचानक ढगाळ वातावरण निर्माण झाले. शनिवारी दिवसभरात तालुक्यात तुरळक पावसाच्या सरी पडू लागल्या आहेत. अचानक निर्माण झालेल्या वातावरणात द्राक्षाच्या सर्वच स्टेजमधील द्राक्षोत्पादकांना ढगाळ हवामानाने चिंताग्रस्त करून सोडले आहे. बागायतदार दिवसांतून एक-दोन वेळा फवारणी घेऊ लागला आहे. त्यामुळे ‘वातावरण ढगाळ आणि द्राक्षोत्पादक घायाळ’ असे चित्र निर्माण झाले आहे.
पूर्व भागामध्ये आॅगस्ट छाटणी घेणाऱ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. प्रतिकूल हवामानामुळे ६ आॅक्टोबरपर्यंत छाटणी न घेण्याचे आवाहन द्राक्षबागायतदार संघटनेने केले होते. त्यानुसार बहुतांशी शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यात द्राक्ष छाटणी घेतली आहे. या बागा फ्लॉवरिंग व पोंगा स्टेजमध्ये आहेत. अचानक हवामानात बदल होऊन शुक्रवारपासून ढगाळ हवामानाने घेरले आहे. ढगाळ वातावरणामुळे सर्वच द्राक्षबागांना फटका बसू लागला आहे.
प्रतिकूल हवामानामुळे फ्लॉवरिंग व पोंगा स्टेजमधील बागांना दावण्या, भुरी, करपा, स्ट्रिप्स यासारख्या रोगांचा फटका बसू लागला आहे. फ्लॉवरिंगमधील बागांच्या द्राक्षघडातील मणी गळणे, कुजणे, फुलोरा झडणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. असे झाले, तर संपूर्ण बागच वाया जाणार आहे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. द्राक्षबागायतदारांनी बागांवर महागड्या औषध फवारणीचा सपाटा सुरू केला आहे. या वातावरणामुळे औषध फवारणी वाढल्यामुळे उत्पादन खर्च दुप्पटीहून अधिक वाढला आहे. दावण्या रोगाचा घडांवर व डोळ्याच्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येऊ लागला आहे. (वार्ताहर)
४द्राक्षबागांवरील दावण्या, भुरी रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी द्राक्षबागायतदारांनी औषध खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी केली आहे. बागांवर महागड्या औषध फवारणीचा सपाटा सुरू झाला आहे. दावण्या अ‍ॅँट्राकॉल, अ‍ॅक्रोबॅट, अलेट, मिलिडो, कर्जटकोसाईट ही औषधे फवारली जात आहेत.
४शुक्रवारी रात्रीपासून बदललेले ढगाळ हवामान, पाऊस आणखी किती दिवस आहे, पावसाचे प्रमाण कसे आहे, याचा कृषी मेसेज केंद्र, इंटरनेटवरील हवामान अंदाजाच्या साईटवरून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार औषधांचे नियोजन व निवड करून आपापल्या बागा वाचविण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.
पलूस तालुक्यात २० टक्के द्राक्षबागांचे नुकसान
पलूस : सलग तीन दिवस असणारे ढगाळ वातावरण व पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील द्राक्षबागांना दावण्या रोगाने विळखा घातला आहे. बाजारात मिळणारी रोगप्रतिबंधक औषधे कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे फुलोऱ्यातील घड कुजून २० टक्के क्षेत्रावरील द्राक्षबागा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यात आॅगस्ट व आॅक्टोबर कालावधित बागांची छाटणी झाली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील द्राक्षबागा पोंगा अवस्थेपासून फुलोऱ्याच्या अवस्थेत आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरणासह पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्षबागा रोगाला बळी पडल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. तालुक्यातील जवळ-जवळ २० टक्के क्षेत्रावरील द्राक्षबागांना दावण्याने विळखा घातला आहे. दावण्याचा सर्वाधिक फटका फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांना बसला आहे. घडामध्ये साचून राहिलेले पाणी व ढगाळ वातावरणामुळे बागेतील घड कुजून चालले आहेत. दावण्या रोगास रोखण्यासाठी एक हजारपासून सहा-सात हजार रुपयांपर्यंत किलो किंवा लिटरमध्ये मिळणाऱ्या औषधांच्या दिवसातून दोन फवारण्या करूनही दावण्या आटोक्यात येत नाही. यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. वातावरण सुधारले नाही आणि दावण्या आटोक्यात आला नाही तर, हंगाम वाया जाईलच, पण औषधे, खते आणि मजुरांवर केलेला खर्च डोक्यावर कर्ज म्हणून राहणार आहे. (वार्ताहर)




 

Web Title: The grapevine collectors, the bhuri jhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.