द्राक्ष हंगाम यंदा महिनाभर लवकर

By Admin | Updated: September 3, 2015 23:45 IST2015-09-03T23:45:19+5:302015-09-03T23:45:19+5:30

मिरज पूर्वमधील चित्र : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांचा निर्णय

The grape season this year is about to start early | द्राक्ष हंगाम यंदा महिनाभर लवकर

द्राक्ष हंगाम यंदा महिनाभर लवकर

संजय जाधव -सोनी पावसाने दडी मारल्याने पुढे पाणी टंचाईचे संकट पाहता, मिरज पूर्व भागासह जिल्ह्यातील द्राक्षपट्ट्यात यावर्षी द्राक्षबागांची माल छाटणी लवकर घेण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षी द्राक्षहंगाम जवळपास महिनाभर लवकर सुरू होणार असून, तो डिसेंबर ते मार्च असा राहण्याची शक्यता आहे. माल छाटणीनंतर लागणारे पाणी कमी पडू शकते, यासाठी द्राक्षबागायतदार हे धाडसी पाऊल उचलत आहेत.मिरज पूर्वसह कवठेमहांकाळ, तासगाव परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात आहे. परिसरातील द्राक्षबागायतदार उत्तम प्रतीची द्राक्षे तयार करण्यासाठी सतत धडपडत असतो. या भागातील बहुतांशी व्यवहार द्राक्ष पिकाच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. गेल्या दोन वर्षांपासून अवकाळी पावसाचा फटका या पिकाला बसला आहे, तर यावर्षी संपूर्ण राज्यासह सांगली जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. याची तीव्रता जिल्ह्याच्या पूर्व भागात अधिक आहे. तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरजपूर्व भागात पावसाने दडी मारल्याने कोरडे हवामान अनुभवास येत आहे. बहुतांशी भागात सप्टेंबरच्या मध्यापासून द्राक्षबागेची माल छाटणी होत असते. पण यावर्षी मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे पाणी टंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने द्राक्षबागा जगवल्या आहेत. पावसाची अशीच अवस्था राहिल्यास पुढील काही महिन्यात पाणी टंचाई व उन्हाची तीव्रता वाढणार आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी आलेल्या अनेक भागात शेतकऱ्यांनी छाटणीची लगबग सुरू केली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात छाटणीची लगबग सुरू होणार आहे. त्यासाठी छाटणीपूर्व कामांना वेग आला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणारा द्राक्ष हंगाम यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच सुरू होण्याची शक्यता आहे.

पाण्याचे व्यवस्थापन करावे : रंगराव जाधव
यंदा पाणीटंचाईमुळे द्राक्ष बागायतदारांनी धाडसी पाऊल उचलले आहे. छाटणी महिनाभर आधीच घेतली आहे. छाटणीसाठी द्राक्ष बागायतदारांनी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया प्रगतशील द्राक्ष बागायतदार रंगराव जाधव यांनी दिली.

Web Title: The grape season this year is about to start early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.